मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली याचा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबद्दल माहिती दिली. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरच्या राज्यातून येणारी लोकं जबाबदार असल्याचं सांगताना पश्चिम बंगाल वैगेरे इतर राज्यांमध्ये लाटा येत नसल्याची टीका त्यांनी केली. तसंच इतर राज्यांमध्ये रुग्ण मोजले नाहीत असंही ते म्हणाले आहेत.

“काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि लॉकडाउनसंदर्भात भेटण्याची विनंती केली होती. पण त्यांच्या आजुबाजूला अनेक लोक करोनाने पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे तेदेखील क्वारंटाइन झाले आहेत. त्यामुळे झूमवर बोलता येतील असं सांगितलं. आम्ही दोघेच असल्याने आमच्यात काय संभाषण झालं आणि मी काय सूचना केल्या हे जनतेपर्यंत आलं नसतं. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत आहे,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“राज्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत आहे. हे महाराष्ट्रातच का दिसत आहे यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. खऱ्या गोष्टी लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे. महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. पश्चिम बंगाल वैगेरे इतर ठिकाणी काही लाटा वैगेरे ऐकिवात नाहीत. महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारी लोक आहेत. आणि त्या राज्यांमध्ये करोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे येत नाहीत,” असं सांगत राज ठाकरेंनी ठाकरे सरकारची पाठराखण केली.

आणखी वाचा- “उद्धव ठाकरेंच्या हाती राज्य आलंय? की उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय?”; राज ठाकरेंचा टोला

“परप्रांतीय जात असताना त्यांची मोजणी आणि चाचणी करण्यासंबंधी मी सूचना केली होती. पण असल्या कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. येत असलेली माणसं मोजलीही नाहीत. त्यामुळे कोण येतंय ,कोण जातंय याचा थांगपत्ता लागणार नसेल तर आज करोना आहे उद्या दुसरं काही असेल. हे दुष्टचक्र थांबणार नाही. आपण बंधन धालत नाही आहोत. हे चित्र चांगलं नाही. त्यामध्ये सर्वांची वाताहत होत आहे,” अशी टीका राज ठाकरेंनी केली.

आणखी वाचा- किंबहुना वापरलं तर चालेल ना? -राज ठाकरे

“शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का? शाळांची फी निम्मी करा. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण केलं पाहिजे. खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी. विशेष गर्दी न होता जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी. ह्या सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा,” अशा मागण्या केली असल्याची माहितीही राज ठाकरेंनी यावेळी दिली.

“अनेक रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील करोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.