विश्वासदर्शक ठरावावेळी भाजप सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. मनसेचा केवळ एकच सदस्य विधानसभेमध्ये आहे. मात्र, राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेने घेतला असल्याचे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यातील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीमध्ये मनसेचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला आहे. जुन्नरमधून पक्षाचे उमेदवार शरद सोनावणे विजयी झाले आहेत. अन्य सर्व ठिकाणी मनसेच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आहे. केवळ एकच सदस्य असल्याने मनसेने आत्तापर्यंत सरकारला पाठिंबा देणार की विरोध करणार हे स्पष्ट केले नव्हते. भाजप सरकार बुधवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सकाळी मनसेने विश्वादर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.