सालाबादप्रमाणे यंदाही मराठी नववर्षदिनी अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी मुबईतील शिवतीर्थावर (शिवाजी पार्क मैदान) मनसेच्या ‘पाडवा मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, देशासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर ते भाष्य करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या ध्येय धोरणांबाबत ते काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मनसेकडून जय्यत तयारी सुरु असून मेळाव्याला गर्दी व्हावी यासाठी विविध ठिकाणी पोस्टर्सद्वारे तसेच सोशल मीडियातून याची माहिती देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत. यामध्ये पुण्यात त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची पहिल्यांदा घेतलेली जाहीर मुलाखत गाजली. यावेळी त्यांनी पवारांना विविध विषयांवर अडचणीत आणणारे प्रश्न विचारले. दरम्यान, त्यांनी आपल्या मनातील खास प्रश्न विचारुन त्यांना बोलत करण्याचा प्रयत्नही केला. या मुलाखतीची राज्यभरातील राजकीय वर्तुळात खूपच चर्चा झाली होती.

तसेच नाशिकहून पायी निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा दोनच दिवसांपूर्वी मुंबईत येऊन धडकला होता. या मार्चाला राज ठाकरे यांनी जाहीर पाठींबा दर्शवला होता. इतकेच नाही, सायन येथील सौमय्या मैदनात विसाव्यासाठी थांबलेल्या या मोर्चेकरांची राज ठाकरे यांनी स्वतः भेट घेतली होती. यावेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार नाही, एकदा माझ्या हातात सत्ता देऊन पहा तुमचे प्रश्न सुटतात की नाही, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले होते.

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राज ठाकरे काहीसे व्यथीत होते. नाशिक महापालिकेत चांगली कामे करूनही लोकांनी नाकारल्याबाबत त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी आता पु्न्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. यामध्ये पक्षाच्या यशासाठी ते काही नवा मंत्र सुचवतात का? आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहनासाठी काय पावले उचलतात? यासाठी त्यांच्या रविवारी शिवाजी पार्कवर होणाऱ्या जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.