१० पोलीस-जवान जखमी, वाहनांची तोडफोड; जमावावर दंगलीचा गुन्हा

मुंबई : धारावीच्या राजीव गांधी नगर येथे राहणाऱ्या सचिन जैस्वार (१७) या तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील रहिवाशांनी शनिवारी रात्री  शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयावर हल्ला चढवला. दगडफेक, तोडफोडीत पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे एकूण १० जवान जखमी झाले. पोलिसांच्या चार वाहनांसह काही खासगी वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी शीव पोलीस ठाण्यात सुमारे शंभरहून अधिक जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मोबाइल चोरीच्या संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या सचिनला पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली. त्यातच त्याची प्रकृती खालावली आणि मृत्यू झाला, असा आरोप जैस्वार कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी मात्र हे आरोप  फेटाळत चौकशीनंतर सचिनला सोडून देण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्याला त्रास सुरू झाला आणि शीव रुग्णालयात दाखल केले गेले. सचिनला लेप्टोची लागण झाल्याचे निदान शीव रुग्णालयातील चाचण्यांवरून स्पष्ट झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

शनिवारी रात्री करण्यात आलेल्या तोडफोडीला याच वादाची किनार होती. सचिनच्या मृत्यूनंतर जैस्वार कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहाची छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला मारहाण केली होती आणि त्या मारहाणीचे वळ सचिनच्या शरीरावर होते. पोलिसांविरोधातील हा महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, असे वाटल्याने कुटुंबीय छायाचित्रांसाठी आग्रही होते. मात्र रुग्णालय कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर जमावाने रुग्णालयात शिरण्याची धडपड सुरू केली. रुग्णलयाच्या प्रवेशद्वारांवर महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी हा जमाव रोखून धरला. सचिनचा मृतदेह शवचिकित्सेसाठी  जे जे रुग्णालयात पाठवण्यातआला. ‘सचिनवर लेप्टोचे उपचार सुरू होते. धारावी पोलीस ठाण्यातून सोडल्यानंतर दोन दिवसांनी त्याची प्रकृती खालावली,’ अशी माहिती सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनी माध्यमांना दिली.

कडेकोट बंदोबस्त

रविवारी शीव रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त होता. रुग्णालयाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि आत पोलीस, असे चित्र रविवारी दिसले. रुग्णालयात शिरू पाहाणाऱ्या प्रत्येकाला नाव काय, कुठे जायचे आहे, रुग्णाचे नाव काय, कर्मचारी असल्यास ओळखपत्र विचारले जात होते.

मोबाइल चोरीच्या संशयावरून १३ जुलैला मध्यरात्री दीडच्या सुमारास धारावी पोलीस पथकाने सचिनला घरातून ताब्यात घेतले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली माझ्यासमोर सचिनला मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता सचिन पोलीस ठाण्यात जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडला होता. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी सचिनला सोडले. घरी आल्या आल्याच सचिनला उलटय़ा सुरू झाल्या. स्थानिक डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्याला शीव रुग्णालयात आणले. सचिनची अवस्था पाहून डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेतले.

– सुनील जैस्वार, सचिनचा मोठा भाऊ

मोबाइल चोरीची तक्रार घेऊन आलेल्या तक्रारदाराने दिलेल्या वर्णनानुसार दोन तरुणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यात सचिनचा समावेश होता. सचिनला घरातून ताब्यात घेतलेले नाही, तर मोठय़ा भावाला सांगून त्याला पोलीस ठाण्यात हजर करून घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान सचिनला अजिबात मारहाण करण्यात आलेली नाही. तक्रारदाराला सचिनची ओळख पटवता आली नाही. त्यामुळे जुजबी चौकशीनंतर त्याला मोठय़ा भावाच्या हवाली करण्यात आले. सचिनचा मृत्यू आणि पोलीस ठाण्यातील चौकशी यात काडीचाही संबंध नाही. उलट शीव रुगणालयात दाखल करून घेतल्यानंतर केलेल्या चाचण्यांच्या अहवालात मारहाणीचा उल्लेख नाही.

 – सुरेश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, धारावी पोलीस ठाणे</strong>