कुर्ला परिसरातील बेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने तणाव निर्माण झाला आहे. मुलीचा शोध न लागल्याने संतप्त जमावाने पोलिसांना मारहाण केली. तसंच दगडफेकही करण्यात आली असून पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मुलीचा शोध न लागल्याने तिचे वडील पंचाराम रिठाडिया यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या अंत्ययात्रेदरम्यान हा सगळा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सायन-पनवेल महामार्गावर अंत्ययात्रेदरम्यान जमावाने रास्ता रोको केला. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना जमावाकडून लक्ष्य करण्यात आलं. पोलिसांना पाठलाग करत जमावाकडून मारहाण करण्यात आली. तसंच मोठ्या प्रमाणात दगडफेकही सुरु होती. यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

काय आहे प्रकरण ?
चेंबूरमधील ठक्कर बाप्पा कॉलनीत राहणाऱ्या पंचाराम रिठाडिया यांची मुलगी बेपत्ता होती. त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. पण मुलीचा काही शोध लागला नव्हता. मुलीचा शोध लागत नसल्याने पंचाराम रिठाडिया यांनी रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केली. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण अंत्ययात्रा सुरु असताना, जमावाकडून हिंसाचार करण्यात आला. अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांनी अचानक दगडफेक सुरु केली आणि पोलिसांना टार्गेट केलं.

यावेळी पोलिसांच्या वाहनांनादेखील लक्ष्य करण्यात आलं आणि तोडफोड करण्यात आली. मारहाणीत दोन पोलीस जखमी झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने आजुबाजूच्या पोलीस स्थानकांमधून फौजफाटा मागवण्यात आला होता. यानंतर जमावावर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. सध्या जमाव पांगवण्यात आला आहे, पण परिसरात तणाव आहे. पोलीस व्हिडीओच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत.