News Flash

Dussehra rally 2019 : तीन मेळाव्यांकडे लक्ष!

नागपुरात संघ, मुंबईत सेना, भगवानगडावर अमित शहा

नागपुरात संघ, मुंबईत सेना, भगवानगडावर अमित शहा

मुंबई : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपल्यानंतर मंगळवारी लगेच विजयादशमीनिमित्त नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, मुंबईत शिवसेनेचा तर भगवानगडावर भाजपचे  अध्यक्ष अमित शहा यांचा असे तीन महत्त्वाचे मेळावे होत असून त्यातून काय राजकीय संदेश दिला जातो यावर पुढील १२ दिवस भाजप व शिवसेना यांच्या महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराची दिशा काय असेल हे स्पष्ट होणार आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा  प्रसिद्ध आहे. शिवसेनेची भूमिका काय आणि वाटचाल कोणत्या दिशेने होणार याचे मार्गदर्शन पूर्वी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे करत. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनोगत मांडत आहेत. मागच्या वर्षी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व व राम मंदिरावर भर देत त्या आधारे भाजपशी युती होऊ शकते, असे अप्रत्यक्ष संकेत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिले होते. तर नागपूरच्या दसरा मेळाव्यात  सरसंघचालक मोहन भागवत यांनीही राम मंदिरावर भर दिला होता. नंतर त्याच वाटेवर जाऊन भाजप-शिवसेना युती झाली. आता १९८९ मध्ये भाजपसह युती झाल्यानंतर शिवसेना प्रथमच धाकटय़ा भावाच्या रूपात सर्वात कमी १२४ जागांवर विधानसभा निवडणुकांना सामोरी जात आहे. तशात आरेच्या प्रश्नावरून शिवसेनेने भाजपवर हल्ला चढवण्याचे धोरण अवलंबले आहे.  दसरा मेळाव्यातील भाषणाने विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा शिवसेनेचा नारळ फुटणार असल्याने उद्धव ठाकरे काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे. तसेच लक्ष नागपुरात मोहन भागवत काय म्हणतात याकडे राहील.

पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने भगवान गडावर मेळावा होत असून निवडणुकीचे निमित्त साधून अमित शहा त्यासाठी येणार आहेत. भाजपची ही पहिलीच प्रचार सभा असून त्यात  शहा प्रचाराचा नारळ फोडतील. त्यांच्या भाषणावरूनच प्रचार कशाभोवती फिरणार हे स्पष्ट होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 3:16 am

Web Title: mohan bhagwat amit shah uddhav thackeray dussera rally zws 70
टॅग : Dussehra
Next Stories
1 आठवलेंचे निष्ठावंत सोनावणे रिंगणाबाहेर
2 Maharashtra assembly election 2019 : राज्यात ३२३९ उमेदवार रिंगणात
3 महायुतीत भाजपविरोधात ‘महा’कुरबुर!
Just Now!
X