माजी अध्यक्ष मोहन जोशी यांचे स्पष्टीकरण

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचा अध्यक्ष होण्याची माझी इच्छा नाही, परंतु आमच्या पॅनेलमधील सदस्यांनी आग्रह केला तर अध्यक्ष होण्यास मी तयार आहे, अशी इच्छा उमेदवारी अर्ज बाद झालेले अ. भा. मराठी नाटय़ परिषदेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी सोमवारी मुंबईत व्यक्त केली.

नाटय़ परिषद निवडणुकीतून मोहन जोशी पॅनेलमधील त्यांच्यासह अन्य तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद जोशी बोलत होते.

नाटय़ परिषद निवडणुकीत माझ्यासह अभिनेते तुषार दळवी, सुनील तावडे यांच्या उमेदवारी अर्जावर अभिनेते अशोक शिंदे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली होती. शिंदे यांचे नाव मतदार यादीत नाही आणि ते नाटय़ परिषदेचे सदस्यही नाहीत. त्यामुळे त्यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केलेले अर्ज बाद ठरविण्यात आले.

तसेच शिंदे यांचाही उमेदवारी अर्ज बाद झाला असल्याचे सांगून जोशी म्हणाले, शिंदे यांच्या सदस्य नसण्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना आम्हाला नव्हती. नाटय़ परिषद निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावरही मी ठाम होतो, मात्र नव्या सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून माझ्या नावाचे पॅनेल उभे करून निवडणूक लढविण्याचे ठरविण्यात आले.

संगीत नाटक अकादमीचा मिळालेला पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला गेल्याने वेळ कमी होता आणि त्यात शेवटच्या दिवशी घाईगडबडीत अर्ज सादर करण्यात आल्याने हा सर्व गोंधळ झाला असावा. आपले पॅनेल निवडून आले तर आपण काय काम करू त्याची माहितीही जोशी यांनी या वेळी दिली. नाटय़ परिषद निवडणुकीबाबत मोहन जोशी पॅनेलसंदर्भातील काही महत्त्वाची घोषणा येत्या २६ फेब्रुवारी रोजी प्रसारमाध्यमांसमोर करणार असल्याचे नाटय़निर्मात्या लता नार्वेकर यांनी या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

पॅनेल सदस्यांनी आग्रह केला म्हणून निवडणुकीत अर्ज बाद झालेला उमेदवार नाटय़ परिषदेचा अध्यक्ष होऊ शकत नाही. निवडणूक प्रक्रियेतून निवडून आलेल्या नवीन अध्यक्षाने कोणत्याही कारणास्तव राजीनामा दिला तर पुन्हा नव्याने निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागेल आणि त्यानंतरच नव्या अध्यक्षाची निवड करता येईल   – गुरुनाथ दळवी, निवडणूक निर्णय अधिकारी