अ. भा. काँग्रेसमध्ये झालेले संघटनात्मक बदल तसेच राष्ट्रवादीने सरकार आणि पक्षसंघटनेत केलेले अदलाबदल या पाश्र्वभूमीवर राज्यातील काँग्रेसमध्येही बदल अपेक्षित आहेत. त्याच वेळी पक्षाच्या राज्याच्या प्रभारीपदी मोहन प्रकाश यांना कायम ठेवण्यात आल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मुक्तवाव मिळणे कठीण असल्याचे मानले जाते.  
काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बदलणार अशी अनेक दिवस चर्चा सुरू आहे. याशिवाय काही मंत्र्यांना वगळण्याची योजना आहे. मात्र मोहन प्रकाश यांच्याशी मुख्यमंत्र्यांचे फारसे सख्य नसून, ते प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांना झुकते माप देतात, अशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात असते. त्यातूनच मंत्रिमंडळातील बदल अथवा महामंडळावरील नियुक्त्या रखडल्या आहेत. काही मंत्र्यांना घरी पाठवून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मुख्यमंत्र्यांची योजना आहे. मात्र बदलांसाठी मुक्तवाव मिळत नसल्यानेच मुख्यमंत्र्यांनी विस्ताराची योजना लांबणीवर टाकली. राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसच्या मंत्र्यांचा विस्तार करण्याची मुख्यमंत्र्यांची योजना होती. पण अ. भा. काँग्रेसमधील संघटनात्मक बदलांमुळेच मुख्यमंत्र्यांनी लगेचच बदल केले नाहीत.
मुख्यमंत्री राजकीय निर्णय घेण्यात कमी पडतात, असा मोहन प्रकाश यांचा आक्षेप असतो. ते प्रभारीपदी कायम राहिल्याने मुख्यमंत्री विरोधकांना बळ मिळाले आहे. प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांना बदलावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केली आहे. काँग्रेस संघटनेत राहुल गांधी हे सारे निर्णय घेतात. मुख्यमंत्री चव्हाण तसेच राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश हे दोघेही राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. राहुल गांधी यांनी गुरुदास कामत यांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्यावर भर दिला असून सरचिटणीसपदी नियुक्ती करतानाच त्यांच्याकडे गुजरात आणि राजस्थान या  राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.