शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर मागील महिन्यात राष्ट्रवादी प्रवेश केलेले नेते मोहन रावले यांनी आज(मंगळवार) पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. सकाळी उध्दवजींची भेट घेऊन चुक झाल्याची कबुली दिली आणि उध्दवजींनीही मोठ्या मनाने मला शिवसेनेत येऊ दिले असल्याचे म्हणत मोहन रावले यांनी झालेल्या चुकीची जाहीर माफी मागितली.
मुंबईतील गिरगाव येथे शिवसेनेचे लोकसभा उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत मोहन रावले स्वगृही परतले. तसेच शरद पवार यांच्यावर नाराज होऊन परत आलेलो नसल्याचेही रावले म्हणाले.
मोहन रावले म्हणाले की, शिवसेनेत परत येत असताना पवारांना फोन केला आणि शिवसेना माझा प्राण आहे, भगव्या झेंड्याशिवाय मी राहू शकत नाही असे सांगितले. पवारांनीही कोणतीही हरकत न दर्शवता माझा मार्ग मोकळा केला. असेही रावले म्हणाले.