गुन्हे शाखेचा न्यायालयात दावा

मुंबई : ‘रिपब्लिक’, ‘न्यूजनेशन’ आणि ‘महामूव्ही’ वाहिन्यांचे चालक किंवा मालक आणि संबंधित व्यक्तींचा टीआरपी घोटाळ्यात सहभाग स्पष्ट झाला असून त्यांचा शोध सुरू आहे. या व्यक्ती गुन्ह्य़ात ‘पाहिजे आरोपी’ (वॉन्टेड) आहेत, अशी माहिती शनिवारी गुन्हे शाखेने दंडाधिकारी न्यायालयाला दिली.

याप्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी दिनेश विश्वकर्मा आणि रामजी वर्मा यांच्या पोलीस कोठडीची मागणी करताना गुन्हे शाखेने हा दावा के ला.  अटक आरोपींकडे केलेली चौकशी आणि त्याआधारे के लेल्या तपासातून कृत्रिमरीत्या टीआरपी वाढविण्यासाठी तिन्ही वाहिन्यांच्या चालक किंवा मालक आणि संबंधित व्यक्तींनी आरोपींना पैसे दिले. यातील काही रक्कम टीआरपी मोजमापासाठी बॅरोमीटर बसविलेल्या ग्राहकांना वाटण्यात आली. ही रक्कम स्वीकारून ग्राहकांनी या तिन्ही वाहिन्या दिवसातील काही तास सुरू (न पाहता) ठेवल्या, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चालक किं वा मालकांसह संबंधित व्यक्तींचा शोध सुरू के ला आहे, असे गुन्हे शाखेने न्यायालयात स्पष्ट केले. तसेच अटकेत असलेल्यांपैकी काही आरोपी, ‘पाहिजे आरोपी’ आणि त्यांचे साथीदार तपासात अडथळे आणत आहेत. तपास पथकावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी तक्रोरही गुन्हे शाखेने के ली.

अर्णब दुसऱ्यांदा गैरहजर

भविष्यात चांगल्या वर्तणुकीसाठी हमीपत्र का घेऊ नये, या कारणे दाखवा नोटिशीवरील सुनावणीस रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी दुसऱ्यांदा गैरहजर राहिले. शनिवारी त्यांनी वरळी विभागाचे सहायक आयुक्त तथा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष हजर राहून आपली बाजू मांडणे अपेक्षित होते. मात्र त्यांचे वकील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाले. वकिलाने गोस्वामी यांच्या उपस्थितीसाठी मुदत मागून घेतली.

‘रिपब्लिक’च्या दोन प्रतिनिधींकडे चौकशी

मुंबई : पोलीस दलात दुफळी निर्माण के ल्याप्रकरणी शनिवारी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी शनिवारी ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी आणि उपसंपादक शावन सेन यांच्याकडे चौकशी केली. दोघांचे जबाब नोंदवण्यात आले.

गुरुवारी ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीने प्रसारित के लेल्या वृत्तात पोलीस दलात दोन गट पडले असून एक गट आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात आहे. हा गट बंड पुकारण्याच्या पवित्र्यात आहे, असा दावा के ला होता. हे दावे निराधार असून त्याद्वारे पोलीस दलात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीने के ला. पोलीस दलाची, पोलीस आयुक्तांची प्रतिमा मलीन के ली, असा आरोप करत मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखेतील उपनिरीक्षकाने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्याआधारे पोलीस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियमानुसार गुन्हा नोंदवला. अन्य व्यक्तींकडे टप्प्याटप्प्याने चौकशी के ली जाईल, असे तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.