मुंबईकरांसाठी ‘जॉय राइड’ ठरलेल्या मोनोरेलच्या पहिल्या टप्प्याला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला असताना आता दुसऱ्या टप्प्याची मुंबईकरांना उत्सुकता आहे. मात्र ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एमएमआरडीए) याही वेळी या दुसऱ्या टप्प्याचा मुहूर्त हुकवला आहे. वडाळा ते जेकब सर्कल हा मोनोरेलचा महत्त्वाकांक्षी दुसरा टप्पा डिसेंबर, २०१५ पर्यंत सुरू होईल, असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात आता ‘एमएमआरडीए’ने हा प्रकल्प २०१६ मध्ये पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे; पण २०१६ मध्ये हा प्रकल्प कोणत्या महिन्यात पूर्ण होईल, हे सांगण्यात मात्र असमर्थता दर्शवली आहे.
चेंबूर ते जेकब सर्कल हा मोनोरेलचा मुंबईतील पहिला टप्पा असेल, असे ‘एमएमआरडीए’ने स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर त्यापुढील टप्पे ‘एमएमआरडीए’ने लांबणीवर टाकत सध्या तरी मुंबईत हा एकच मोनोरेल प्रकल्प प्रस्तावित असल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकल्पाचा चेंबूर ते वडाळा हा टप्पा १ फेब्रुवारी २०१४ मध्ये कार्यान्वित झाला होता. त्यानंतर पुढील वडाळा ते जेकब सर्कल या टप्प्यासाठी आखलेल्या सर्वच कालमर्यादा चुकल्या आहेत.
या टप्प्यात मोनोरेल लालबागसारख्या दाट वस्तीच्या भागातून, तसेच करीरोड रेल्वे स्थानकावरून जाते. त्यामुळे या कामात अनेक इतर संस्थांची परवानगी मिळवणे गरजेचे होते. काही महिन्यांपूर्वी रेल्वेने विशेष ब्लॉक देत ‘एमएमआरडीए’ला करीरोड स्थानकाजवळील मोनोरेलचा गर्डर टाकण्यासाठी वेळ देऊ केला होता. हा गर्डर टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे डिसेंबर, २०१५चा मुहूर्त ‘एमएमआरडीए’ गाठणार, असेही बोलले जात होते.
प्रत्यक्षात नवीन वर्ष सुरू झाले, तरी अद्याप ‘एमएमआरडीए’ने मोनोरेलच्या या दुसऱ्या टप्प्याबाबत अजूनही काहीच जाहीर केलेले नाही. हा प्रकल्प २०१६ मध्ये कार्यान्वित होणार असल्याचे मोघम उत्तम ‘एमएमआरडीए’ देत आहे, पण २०१६च्या कोणत्या महिन्यात हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत येईल, याबाबत काहीही वक्तव्य करण्यात आलेले नाही. याबाबत एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याला विचारले असता त्याने मार्च, २०१६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर तीन महिने या मार्गावर चाचणी फेऱ्या होतील आणि जून २०१६ मध्ये प्रवाशांसाठी मोनोरेलचा दुसरा टप्पा खुला होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

मोनोरेलचा दुसरा टप्पा
* वडाळा डेपो ते जेकब सर्कल
* एकूण अंतर -११.६ किमी
* प्रकल्पासाठीचा खर्च – १९०० कोटी रुपये
* एकूण स्थानके – ११
* अंदाजे प्रवासी संख्या – १.५ लाख
* स्थानकांची नावे – गुरू तेगबहाद्दुर नगर, अँटॉप हिल, आचार्य अत्रे नगर, वडाळा ब्रिज, दादर पूर्व, नायगाव, आंबेडकर नगर, मिट कॉलनी, लोअर परळ, चिंचपोकळी, जेकब सर्कल.