कोकणात दोन दिवस मुसळधार सरींचा अंदाज; पुढे आठवडाभर थांबणार

मुंबईकरांच्या भेटीला येऊन आठवडाभर दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा रविवारी येण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी व  सिंधुदूर्ग जिल्ह्य़ांमध्ये काही ठिकाणी रविवारी व सोमवारी मुसळधार सरी येण्याचा अंदाज आहे. मात्र मोसमी पावसाची संततधार सुरू होणार नसून आणखी किमान एक आठवडा मोसमी पाऊस पुढे सरकणार नसल्याचे केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.

मोसमी वारे सुरू झाले की पश्चिम किनारपट्टीवर पावसाची संततधार लागते. यावेळी नऊ जून रोजी मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाला तरी शनिवारचा अपवाद वगळता पावसाच्या केवळ एक- दोन सरी येत आहेत. शनिवारी दक्षिण कोकणात पावसाचा सरींची संख्या वाढणार असून रविवारी व सोमवारी मुंबईतही पावसाचा जोर वाढेल. काही ठिकाणी मुसळधार सरीही येतील. राज्याच्या इतर भागात मात्र पावसाची केवळ तुरळक सरी येतील. हा पाऊस दोन दिवसांचा पाहुणा असून पावसाची संततधार लागण्यासाठी मात्र आठवडय़ाहून अधिक काळ लागेल.

मोसमी पावसाने आठ जूनला राज्यात प्रवेश केला होता, नऊ जूनला मुंबईपर्यंत मजल मारली होती तर १२ जूनपर्यंत विदर्भात पोहोचला होता. मात्र त्यानंतर मोसमी वाऱ्यांची प्रगती थांबली असून आणखी आठ दिवस तरी मोसमी पावसाचे चक्र पुन्हा सुरू होणार नाही. केरळमध्ये वेळेआधी दाखल होऊन राज्यात वेळेत पोहोचलेल्या मोसमी वारे कमकुवत होण्यामागे जागतिक हवामानातील घडामोडी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. वाऱ्यांचा मंदावलेला वेग तसेच समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र नसल्यानेही मोसमी वाऱ्यांच्या आगमनावर परिणाम होऊ शकतो. मात्र भारतीय हवामानशास्त्र विभागाने यापैकी कोणत्याही कारणाला दुजोरा दिलेला नाही. राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला असून टप्प्याटप्प्यात प्रवास करणाऱ्या मोसमी पावसाचे हे वैशिष्टय़ आहे. अशा प्रकारे मोसमी वाऱ्यात खंड पडणे फारसे दुर्मिळ नाही, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.