दिवाळी निमित्त प्रवाशांची गर्दी वाढत असून प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने काही विशेष गाडय़ा सोडण्याचे जाहीर केले आहे. पश्चिम रेल्वेने जयपूर आणि जोधपूर त्याचप्रमाणे अहमदाबादसाठी विशेष गाडय़ा सोडल्या आहेत.
वांद्रे टर्मिनस ते जयपूर दरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी रविवारी सकाळी सोडण्यात आली. वांद्रे टर्मिनस ते जोधपूरसाठी सोमवारी, १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.५० वाजता विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. जोधपूर येथून १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुटणारी गाडी वांद्रे टर्मिनस येथे १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल.
मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान १२, १४ आणि १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता विशेष वातानुकूलित सुपरफास्ट गाडी सुटणार आहे. अहमदाबाद येथून याच दिवशी रात्री ८.५५ वाजता ही गाडी मुंबई सेंट्रलकरीता सुटेल आणि मुंबई सेंट्रल येथे पहाटे पाच वाजता पोहोचेल. ही गाडी बोरिवली, सुरत, वडोदरा आणि आणंद येथे थांबणार आहे.
मध्य रेल्वेने नागपूर आणि पुणे दरम्यान दोन गाडय़ा सोडण्याचे जाहीर केले आहे. १६ नोव्हेंबर रोजी ०१०२१ ही गाडी नागपूर येथून सकाळी ११.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल.
पुण्याहून पहाटे ५.२० वाजता ०१०२२ ही गाडी नागपूरसाठी सुटेल आणि नागपूरला त्याच दिवशी रात्री १०.१० वाजता पोहोचेल. ही विशेष गाडी वर्धा, बडनेरा, भुसावळ, मनमाड, अहमदनगर आणि दौंड येथे थांबेल.