गेल्या सहा महिन्यांत १९२ जणांचा मृत्यू; मृतांमधील १०८ जणांना अन्य कोणत्याही आजाराची बाधा नाही

मुंबई : राज्यात गेल्या सहा महिन्यांत झालेल्या १९२ स्वाइन फ्लूच्या मृत्यूंमध्ये १०४ रुग्ण हे ४०  ते ६० वयोगटांतील आहेत. मृत्यूपैकी १०८ रुग्णांना मधुमेह, रक्तदाब असे कोणतेही अन्य आजारांची बाधा झालेली नव्हती असे राज्य संसर्गजन्य विभागाने दिलेल्या माहितीतून निदर्शनास आले आहे.

स्वाइन फ्लू हा आजार प्रतिकारकशक्ती कमी असलेल्या रुग्णांना होण्याचा अधिक संभव असतो. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब इत्यादी व्याधी जडलेल्या व्यक्ती, गरोदर महिला आणि ज्येष्ठ व्यक्ती धोकादायक वयोगटातील समजले जातात. परंतु राज्य संसर्गजन्य विभागाने आकडेवारीनुसार मृत्यूंमध्ये हे ४० ते ६० वयोगटांतील रुग्णांचा सर्वाधिक समावेश आहे आणि हे अधिक चिंताजनक असल्याचे व्यक्त केले जात आहे. त्या खालोखाल मृतांमधील ३९ जण हे ज्येष्ठ नागरिक वयोगटातील आहेत.

मृतांमधील एकाही व्यक्तीला टॅमीफ्लूची लस दिलेली नव्हती.

१९२  मृतांपैकी १०२ जणांचा ग्रामीण भागात आणि ९० जणांचा शहरी भागात मृत्यू झाला आहे. तसेच यात १०१ पुरुष आणि ९१ महिलांचा समावेश असून पाच महिला गर्भवती होत्या.

एकूण मृत्यू झालेल्यांपैकी ६० रुग्णांना रक्तदाब, मधुमेह किंवा दोन्ही आजार होते, तर १०८ रुग्णांना अन्य कोणतेही आजार नव्हते. एकीकडे कोणताही आजार नाही आणि धोकादायक वयोगटातील नसलेल्या व्यक्तींचा मृतांमध्ये मोठय़ा प्रमाणावर समावेश असल्याने याची कारणमीमांसा पडताळण्यात आली. यामध्ये ८२ टक्के मृत्यू हे खासगी रुग्णालयांमध्ये झाले असून लक्षणे दिसून आल्यानंतर दोन ते आठ दिवसांहूनही अधिक काळ उशीर केल्याचे निदर्शनास आले. लक्षणे दिसून आल्यानंतर चाचणी अहवालांवर विसंबून न राहता उपचार सुरू करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

वयोमानानुसार स्वाइन फ्लूच्या मृतांची आकडेवारी

वय                                मृतांची संख्या

एकवर्षांखालील                ०

१ ते १०                             ५

११ ते २०                            ४

२१ ते ३०                           १७

३१ ते ४०                           २३

४१ ते ५०                           ५३

५१ ते ६०                           ५१

६१ ते ७०                           ३५

७१ वर्षांवरील                      ४