९ महिन्यांच्या बाळाला तिच्या आईने यकृत दान केले आहे. आईची माया काय असते तेच या उदाहरणातून समोर आले आहे. आई आपल्या मुलासाठी कोणताही त्याग करू शकते हे आपल्याला ठाऊक आहेच. आता अशीच एक बातमीही समोर आली आहे. ९ महिन्यांच्या बाळाचे यकृत खराब झाले होते, त्यामुळे त्याच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. इतक्या लहान बाळावर करण्यात आलेली ही पहिली शस्त्रक्रिया आहे. मुंबईतील वोक्हार्ट रूग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. काव्य राऊत असे या मुलाचे नाव आहे.

जन्माच्या वेळी काव्यला बिलीयरी आर्टेसिया हा आजार झाला होता. त्या आजारावर काव्य २ महिन्यांचा असताना शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. त्यामुळे काव्यला यकृताचा आजार जडला. या आजारामुळे काव्यचे यकृत निकामी झाले. याच कारणामुळे त्याचे वजनही वाढत नव्हते. एवढेच नाही तर काव्यला कावीळही झाली ज्यामुळे त्याच्या पोटात पाणी झाले. काव्यला रूग्णालयात दाखल करावे लागले. रूग्णालयात त्याला अति दक्षता विभागात ठेवण्यात आले. काव्य ६ महिन्यांचा होता तेव्हापासून त्याच्यावर उपचार केले असल्याची माहिती वोक्हार्ट रूग्णालयाचे डॉक्टर ललित वर्मा यांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

१४ तास काव्यवर शस्त्रक्रिया सुरु होती. पालघरच्या घोळवड येथे राहणारा ९ महिन्यांचा काव्य याला यकृताचा आजार जडल्याने त्याचे यकृत प्रत्यारोपण करावे लागले. शस्त्रक्रिये दरम्यान आम्ही काव्यचे निकामी झालेले यकृत काढून टाकले. तसेच त्याच्या आईच्या यकृताचा काही भाग आम्ही प्रत्यारोपणासाठी घेतला. तो भागही बाळासाठी मोठा होता. हा यकृताचा भाग छोटा करण्यात आला आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. रक्तवाहिन्या जोडल्यावर यकृत उत्तम प्रकारे कार्यरत असल्याचे आम्हाला समजले अशी माहिती डॉक्टर अनुराग यांनी दिली.

आम्हाला बाळाच्या आतड्यांना कोणतीही इजा न पोहचवता आणि जास्त रक्त न घालवता शस्त्रक्रिया पार पाडायची होती. त्यामुळे या शस्त्रक्रियेला वेळ लागला. काव्यने इतक्या लहान वयात शस्त्रक्रिया आणि भूल हे सहन केले याबद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.