आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वृत्त विभागात नवीन हंगामी कर्मचारी नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वृत्त विभागातील हंगामी कर्मचाऱ्यांनी थकीत मानधनाच्या निषेधार्थ  ‘काम बंद’ आंदोलन पुकारल्यामुळे २३ ऑगस्ट रोजी मराठीतील राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होऊ शकले नव्हते. आकाशवाणीच्या इतिहासात पहिल्यांदा बातमीपत्र रद्द करण्याची नामुष्की ओढविली होती. त्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आकाशवाणी सूत्रांकडून सांगण्यात येते.

आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी प्रादेशिक भाषेतील राष्ट्रीय बातमीपत्रे बंद करून त्या त्या राज्यांच्या राजधानीतील आकाशवाणी केंद्रावरून त्याचे प्रसारण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सकाळी साडेआठ, दुपारी दीड वाजता प्रसारित होणारे बातमीपत्र मुंबई केंद्राच्या वृत्त विभागाकडे देण्यात आले. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वृत्त विभागात हंगामी वृत्तनिवेदकासह भाषांतरकार, टंकलेखक, वार्ताहर, निर्मिती साहाय्यक आदी सुमारे शंभर जण हंगामी कर्मचारी म्हणून काम करतात. या सर्वाचे गेल्या तीन महिन्यांपासूनचे मानधन थकीत आहे. हंगामी कर्मचाऱ्यांनी याबाबत संबंधितांचे वेळोवेळी लक्ष वेधले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने या सर्वानी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. त्यामुळे सकाळी साडेआठ वाजता प्रसारित होणारे मराठी भाषेतील राष्ट्रीय बातमीपत्र २३ ऑगस्ट रोजी प्रसारित झाले नाही.

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून तीन राष्ट्रीय, दोन प्रादेशिक आणि दर तासाला एक अशी सुमारे पंधरा बातमीपत्रे दररोज प्रसारित होत असतात. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात हंगामी कर्मचाऱ्यांची गरज आकाशवाणीला लागते. त्यामुळे सध्याच्या ‘पॅनेल’वरील हंगामी कर्मचाऱ्यांना कमी करून नवीन हंगामी कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

गेली पाच ते दहा वर्षे काम करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नवे हंगामी कर्मचारी नेमून काम रेटायचा प्रयत्न सुरू केला आहे. पण जुन्या हंगामी कर्मचाऱ्यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न तसाच अधांतरी लटकवून नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणे म्हणजे मूळ दुखण्यावर उपाय न करता तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रकार असल्याची टीका जुन्या हंगामी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

’ नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवनातून भारतीय प्रादेशिक भाषेतील राष्ट्रीय बातमीपत्रांचे प्रसारण बंद करून ही बातमीपत्रे त्या त्या राज्यांच्या राजधानीतील आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

’ बातमीपत्र प्रसारित न होण्याच्या सर्व कारणांची योग्य ती चौकशी करून त्यानंतरच दोषारोप निश्चित केला जावा, असेही डॉ. जोशी यांनी या निवेदनात म्हटले आहे. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून २३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजताचे मराठीतील राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित झाले नव्हते. त्या पाश्र्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले आहे.