रेल्वे विकास महामंडळाकडून निविदा प्रक्रिया

मुंबई : विविध सोयीसुविधांची वानवा असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील १९ स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) घेतला आहे. यासाठी सल्लागार नेमण्याकरिता निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या स्थानकांमध्ये घाटकोपर, मुलुंड, भांडुप, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ, कसारा, जीटीबी नगर, गोवंडी, मानखुर्द, मुंबई सेन्ट्रल, जोगेश्वरी, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा, विरार या स्थानकांचा समावेश आहे.

योग्य ठिकाणी नसलेले प्रवेशद्वार, प्रसाधनगृहांची दुरवस्था, प्रवाशांसाठी उपलब्ध नसलेली आसनव्यवस्था अशा सोयीसुविधांची पश्चिम, मध्य रेल्वे स्थानकात वानवाच आहे. प्रवासी संख्या वाढत असली तरी त्या मानाने सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. त्यामुळे सोयीसुविधा देऊन स्थानकाचा पुनर्विकास करण्याची योजना ‘एमआरव्हीसी’ने आखली आहे. रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी प्रवेशद्वार नेमक्या कोणत्या ठिकाणी असावे, प्रवाशांना फलाटावर उभे राहण्यासाठी अधिकाधिक कशी जागा उपलब्ध होईल, सरकते जिने व लिफ्टची असलेली गरज, चांगली प्रसाधनगृहे इत्यादी सुविधा देऊन स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याची योजना ‘एमआरव्हीसी’ने आखली आहे.

एमयूटीपी-३ ए अंतर्गत हा पुनर्विकास केला जाणार असून नुकतीच केंद्र सरकारकडूनही त्याला मंजुरी मिळाली आहे. प्रवाशांच्या गरजा पाहता स्थानकातील सुविधा देणारा प्रकल्प प्रथम करण्याचा निर्णय घेतला. प्रथम सल्लागार नेमण्यात येणार असून त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतील आचारसंहितेमुळे त्याचे काम थांबले होते. सुविधा कशाप्रकारे व नेमक्या कुठे हव्यात याचा अहवाल सल्लागार देणार आहेत.

या स्थानकांचा पुनर्विकास

’ मध्य रेल्वे मुख्य मार्ग- घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ, कसारा,

’ हार्बर रेल्वे- जीटीबी नगर, गोवंडी, मानखुर्द,

’ पश्चिम रेल्वे- मुंबई सेन्ट्रल, जोगेश्वरी, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा, विरार

रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम दोन ते तीन वर्षांत पूर्ण होईल. आधुनिकीकरण करण्याबरोबरच स्थानकांत मोठय़ा प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

– अनिल पतके, प्रवक्ता, एमआरव्हीसी