05 March 2021

News Flash

एसटीचा प्रवास आणखी गारेगार!

राज्यातील खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करत प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आता ‘शिवनेरी’ श्रेणीतील तब्बल ५०० गाडय़ा भाडय़ावर घेण्याचा प्रस्ताव आखला आहे.

| August 14, 2015 02:57 am

राज्यातील खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करत प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आता ‘शिवनेरी’ श्रेणीतील तब्बल ५०० गाडय़ा भाडय़ावर घेण्याचा प्रस्ताव आखला आहे. १० ऑगस्ट रोजी झालेल्या महामंडळाच्या बैठकीत परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी हा प्रस्ताव मांडला असून लवकरच त्याबाबतचे सर्वेक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन होणार आहे. त्या समितीच्या अहवालानंतर निविदा प्रक्रियेद्वारे या गाडय़ा एसटीच्या सेवेत येतील. या गाडय़ा मुंबई-पुणे-नाशिक या नेहमीच्या मार्गाऐवजी राज्यातील इतर मार्गावरही धावतील.
एसटीची शिवनेरी सेवा प्रामुख्याने ‘दादर-पुणे’, ‘ठाणे-पुणे’, ‘पुणे-औरंगाबाद’ आणि ‘पुणे-नाशिक’ या मार्गावर चालवली जाते. एसटीच्या विस्तारीकरणाच्या आराखडय़ामध्ये ही  सेवा राज्यभरात इतर ठिकाणीही चालवण्याचा विचार आहे. त्यात प्रामुख्याने औरंगाबाद-नागपूर, पुणे-नागपूर, नाशिक-मुंबई, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर अशा अनेक मार्गावर ही सेवा चालण्याची शक्यता आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यावर त्यांनी एसटीची प्रतिमा उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
याच धोरणाचा भाग म्हणून एसटीने ७० नव्या वातानुकूलित गाडय़ा विकत घेण्याचा निर्णय घेतला असून व्होल्वो आणि स्कॅनिया कंपनीच्या नव्या गाडय़ा एसटीच्या ताफ्यात दाखल होत आहेत. त्याचप्रमाणे आता १० ऑगस्ट रोजी झालेल्या एसटी महामंडळाच्या बैठकीत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटीसाठी ५०० ‘शिवनेरी’ श्रेणीच्या बसगाडय़ा भाडय़ाने घेण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने त्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पुण्याहून राज्यभरात तब्बल अडीच ते तीन हजार खासगी बसगाडय़ा प्रवासी वाहतूक करतात. या खासगी वाहतुकीला शह देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. या ५०० गाडय़ांपैकी ४५०-४७५ गाडय़ा शिवनेरी श्रेणीतील वातानुकूलित असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 2:57 am

Web Title: msrtc proposal to take 500 luxury bus on rental basis
Next Stories
1 पर्यटनप्रेमाला उधाण
2 चांगला लेखक विचारसरणीच्या आहारी जात नाही – भालचंद्र नेमाडे
3 पावसाच्या लपंडावामुळे पाणी कपातीचे संकट?
Just Now!
X