मुलुंड पथकर नाक्यावर सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी; पिवळय़ा पट्टीबाबतच्या सूचनेला हरताळ

मुंब्रा बावळण रस्ता दुरुस्तीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पर्यायी मार्गावर वाढलेला अवजड वाहतुकीचा भार आता सर्वसामान्य वाहनचालकांना असहय़ होऊ लागला आहे. अवजड वाहनांमुळे मुलुंड येथील पथकर नाक्यावर दररोज सकाळ-संध्याकाळी वाहनांच्या रांगा लागत आहेत. मुंब्रा बावळण रस्ता पुन्हा सुरू होईपर्यंत मुलुंड किंवा ऐरोली या दोन टोलनाक्यांपैकी एकाच ठिकाणी टोलवसुली करावी तसेच टोलनाक्यावरील वाहनांच्या रांगा पिवळय़ा पट्टीच्या पुढे गेल्यास टोल वसुली थांबवावी, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून टोलवसुली करण्यात येत असल्याने मुलुंड नाक्यावरून बाहेर पडेपर्यंत वाहनचालकांना किमान तासभर वेळ खर्च करावा लागत आहे.

अवजड वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला मुंब्रा बावळण रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी गेल्या महिनाभरापासून बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरून जाणारी वाहतूक वेगवेगळय़ा मार्गानी वळवण्यात आली असली तरी, या वाहतुकीचा मोठा भार ऐरोली आणि मुलुंड येथील टोलनाक्यांवर पडत आहे. पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन करताना अवजड वाहनांना या मार्गावरून ये-जा करण्यासाठी विशिष्ट वेळा आखून दिल्या होत्या. मात्र, या वेळांचे पालन अजिबात होत नाही. अवजड वाहने कोणत्याही वेळी मुलुंड टोलनाक्यावरून मार्गक्रमण करतात. त्यातही सकाळ-सायंकाळी, जेव्हा या मार्गावर खासगी वाहनांची वर्दळ वाढलेली असते, तेव्हादेखील अवजड वाहने या गर्दीत शिरत असल्याने मुलुंड टोलनाक्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. गेल्या चार दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून अनेक चालक वाहने धिम्या गतीने चालवतात. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असते. मात्र कधी कधी वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बऱ्याच वेळा ही वाहने या मार्गावर तशीच अडकून राहतात. गेल्या एक महिन्यापासून नितीन कंपनी ते ऐरोली पथकर नाका या मार्गावर बंद पडणाऱ्या अवजड वाहनांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम वाहतूक कोंडीतून दिसून येत आहे.

पालकमंत्र्यांचे आदेश कचरापेटीत

मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याचे काम सुरू असताना दोन पथकर नाक्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना एका पावतीवर सोडून दिले जावे असे आदेश पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी दिले होते. या आदेशाला पथकर व्यवस्थापनांनी पहिल्या दिवसापासून जुमानलेले नाही. त्यामुळे अवजड वाहनांच्या पथकर नाक्यांवर लांबच लांब रांगा लागत आहेत. याचा फटका इतर सामान्य वाहनचालक प्रवाशांना बसत आहे. वाहनांच्या रांगा पिवळ्या पट्टीच्या पुढे गेल्यास पथकर व्यवस्थापनाकडून टोल आकारणी करू नये असे ठरविण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी व्हावी यासाठी खुद्द िशदे आग्रही होते. असे असताना आनंदनगर पथकर नाका आणि ऐरोली पथकर नाक्यावर पिवळ्या पट्टीच्या मागे वाहनांची रांग गेली तरी सर्वच वाहनांकडून टोल वसुली होत आहे.

पावसामुळे काही वाहने बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेही वाहतूक कोंडी होत आहे. पावसामुळे वाहनांचा वेग मंदावतो आणि वाहनांच्या दूरवर रांगा लागून कोंडी निर्माण होते. मुंब्रा बाह्य़वळण रस्त्यावरील वाहने दुपारी आणि रात्री सोडण्यात येतात. त्यामुळे या वाहनांच्या शिरकावामुळे वाहतूक कोंडी होते असे म्हणता येणार नाही.

अमित काळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा