मुंबईतील रुग्णांची संख्या वाढत असून सोमवारी ७६० नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला. दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या तीन-चार दिवसांच्या तुलनेत कमी असली तरी रुग्णवाढीचा दर वाढून ०.२२ टक्कय़ांवर गेला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढत असून सध्या ७ हजार ३९७ रुग्ण उपचाराधीन आहेत.

सोमवारी ७६० नवीन रुग्ण आढळल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३ लाख १९ हजार ८८८ झाली आहे, तर एका दिवसात ६३४ रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत ३ लाख १८० म्हणजेच ९४ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही हळूहळू वाढू लागली असून सध्या ७ हजार ३९७ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी लक्षणे नसलेल्या रुग्णाची संख्या वाढते आहे. सुमारे ४ हजार ८५१ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत तर सुमारे २ हजार १४९ रुग्णांना लक्षणे आहेत. २७६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे.  रविवारी १३ हजार ३०० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी सहा टक्कय़ांहून अधिक अहवाल होकारात्मक आले आहेत. आतापर्यंत ३१ लाख ४६ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ३ पुरुष व १ महिला होती. तिघांचे वय ६० वर्षांवर होते. मृतांची एकूण संख्या ११ हजार ४४६ वर गेली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर आणखी वाढून ०.२२ टक्के  झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही ३२१ दिवसांपर्यंत खाली आला आहे.

सर्वच भागांत वाढती रुग्णसंख्या

मुंबईत आता सर्वच भागांत रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मुलुंड, वांद्रे, चेंबूर, वडाळा, शीव, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, ग्रँटरोड, भांडुप, देवनार या भागात रुग्णवाढ सर्वात अधिक आहे. पालिकेने आता रुग्णांच्या निकट संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे प्रमाण वाढवण्याचे ठरवले असून एका रुग्णामागे १५ संपर्क शोधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सोमवारी एका दिवसात पालिकेने रुग्णांच्या निकटचे ७ हजार २९८ संपर्क शोधले आहेत.