‘प्रभाग’फेरी : ‘ए’ विभाग

मुंबई महापालिकेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरावर आपली सत्ता गाजवण्यासाठी प्रत्येक पक्ष कसून तयारी करत आहे. सत्ताधाऱ्यांकडून विविध कामांचा सपाटा सुरू आहे तर, विरोधकांकडून शिवसेना-भाजपला कोंडीत पकडण्याची खेळी सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप, राजकारण, शह-काटशह यांच्या या रणधुमाळीत मतदारांची नेमकी अवस्था काय आहे? मुंबईतील विविध प्रभागांमध्ये कशी स्थिती आहे? गेल्या पाच वर्षांत किंवा त्याही पलीकडे या प्रभागांमधील कोणते प्रश्न सुटले व कोणते प्रश्न रखडले आहेत, अशा सर्व गोष्टींचा पालिकेच्या विभागानुसार आढावा घेणारी ही विशेष निवडणूक मालिका आजपासून..

कुलाबा, कफ परेड, नेव्ही नगरपासून थेट चर्चगेट आणि क्रॉफर्ड मार्केटपर्यंत पसरलेल्या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत तब्बल अडीच लाख लोकसंख्या सामावली आहे. उत्तुंग आकर्षक इमारती, ऐतिहासिक संदर्भ असलेल्या आणि ऐतिहासिक वास्तुकलेचा नमुना सादर करणाऱ्या इमारती या विभागाचे मुख्य आकर्षण. या विभागातील पालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी टर्मिनस, गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंटचा सागरी किनारा, उपवन उद्यान आदी स्थळी पर्यटकांचा कायम राबता असतो. काळाघोडा, जे. जे. कला महाविद्यालयाच्या निमित्ताने या भागात कलावंतांचीही मोठय़ा प्रमाणावर ये-जा असते. छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट ही महत्त्वाची रेल्वे स्थानके असल्याने येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. महाराष्ट्राचा राज्यशकट याच परिसरात असलेले मंत्रालय, विधान भवनातून चालविला जातो. मंत्री, उद्योगपती आदींचे वास्तव्य, सरकारी, निम-सरकारी, खासगी बडय़ा कंपन्यांची कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँकांची मुख्यालये या परिसरात आहेत. त्यामुळेच मुंबईच्या एका टोकाला असूनही या परिसराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

मागील निवडणुकीत या विभाग कार्यालयाच्या हद्दीत २२४ ते २२७ या चार प्रभागांमध्ये निवडणूक झाली होती. मुंबईमध्ये २०११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेतील लोकसंख्या विचारात घेऊन अलीकडेच प्रभाग फेररचना करण्यात आली. ‘ए’ विभागातील लोकसंख्या कमी झाल्याने प्रभाग फेररचनांमध्ये या परिसरातील एक प्रभाग कमी करण्यात आला. या प्रभागाचा परिसर अन्य प्रभागांमध्ये विलीन झाला असून आगामी निवडणुकीत ‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत तीन प्रभागांमध्ये निवडणूक होणार आहे.

सध्याचे नगरसेवक

प्रभाग२२४

प्रभाग२२५

प्रभाग२२६

  • नगरसेवक – अनिता यादव, काँग्रेस

प्रभाग२२७

  • नगरसेवक – मकरंद नार्वेकर, अपक्ष
  • फेररचनेनंतरची प्रभाग रचना

प्रभाग २२५

  • लोकसंख्या – ६१,३४१
  • आरक्षण – अनुसूचित जाती (महिला)
  • प्रभागक्षेत्र – फोर्ट, ताजमहाल हॉटेल, गेट वे ऑफ इंडिया

प्रभाग २२६

  • लोकसंख्या – ६२,९७८
  • आरक्षण – सर्वसाधारण महिला
  • प्रभागक्षेत्र – नरिमन पॉइंट, मच्छीमार नगर, गणेशमूर्ती नगर

प्रभाग २२७

  • लोकसंख्या – ६०,६९५
  • आरक्षण – खुला
  • प्रभागक्षेत्र – गीता नगर, अफगाण चर्च, नेवी नगर

विभागातील समस्या

वाहतूक कोंडी

कुलाबा, नरिमन पॉइंट परिसरातील कार्यालयात जाण्यासाठी सकाळी, तर कार्यालये सुटल्यानंतर संध्याकाळी या परिसरात प्रचंड वर्दळ असते. पादचाऱ्यांमुळे पदपथ फुलून जातात, तर उपनगरांच्या दिशेने जाणारे रस्ते वाहनांच्या रांगांमध्ये हरवून जातात.

फेरीवाल्यांचा उपद्रव

या परिसरातील अनेक पदपथांवर फेरीवाल्यांना ठाण मांडले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या पथाऱ्यांमधून वाढ काढत पादचाऱ्यांना पुढे जावे लागते.

पुनर्विकासाचा पेच

मुंबईतील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींमधील असंख्य रहिवाशी कुलाबा परिसरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरात गेली अनेक वर्षे खितपत पडले आहेत. संक्रमण शिबिरात काही इमारती बांधून रहिवाशांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न म्हाडाने केला आहे. परंतु आजही अनेक कुटुंबे संक्रमण शिबिरातील खुराडय़ात जीवन जगत आहेत. आपली इमारत कधी बांधून होईल याकडे हेरहिवासी गेली ३०-४० वर्षे डोळे लावून आहेत.

झोपडय़ा येथेही

या परिसरातही झोपडपट्टय़ांची संख्या कमी नाही. या झोपडपट्टय़ांमध्ये सांडपाण्याचा निचरा, अपुरी शौचालये, डासांचा प्रादुर्भाव, अपुरा पाणीपुरवठा अशा परंपरागत समस्या भेडसावतात.

वाहनतळांची समस्या

वाहने उभी करण्यासाठी पालिकेने या परिसरात ५४ सार्वजनिक वाहनतळांची व्यवस्था केली आहे. तरीही वाहने उभी करण्यासाठी जागा कमी पडत आहे.

छोटय़ा मैदानांची कमतरता

आझाद मैदान, ओव्हल मैदान, क्रॉस मैदान अशी मोठी मैदाने या भागात आहेत. परंतु, छोटी मैदाने व उद्याने यांचा या परिसरात अभाव दिसतो.

सेनाभाजपचा वाढता प्रभाव

कुलाबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने अनेक वर्षे आपल्याकडे राखला होता. त्याचप्रमाणे लोकसभेचा दक्षिण मुंबई मतदारसंघही काँग्रेसने जपला होता. मर्झबान पात्रावाला यांच्या निधनानंतर शिवसेनेने कुलाबा विधानसभा मतदारसंघाला खिंडार पाडले. मात्र त्यानंतर काँग्रेसच्या अ‍ॅनी शेखर यांनी पुन्हा या मतदारसंघात बाजी मारली. मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत या मतदारसंघात काँग्रेसचा धुव्वा उडाला आणि शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले. त्यापाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुकीत कुलाबा मतदारसंघात भाजपच्या रा. के. पुरोहित यांना यश मिळाले. पालिकेच्या मागील निवडणुकीमध्येही काँग्रेसला ‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील चार प्रभागांवर आपले वर्चस्व टिकविता आले नाही. चारपैकी दोन प्रभाग राखण्यात काँग्रेसला यश मिळाले. एका प्रभागात शिवसेना, तर दुसऱ्या प्रभागात अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. पालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या विभागात आक्रमक झाली आहे. त्याचबरोबर विद्यमान अपक्ष नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनीही कंबर कसून राजकीय पक्षांना रोखण्याची तयारी सुरू केली आहे.

पालिकेकडून नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी लोकसंख्या लक्षात घेता ते अपुरे आहे. कफ परेड परिसरात पाणी माफियांचे साम्राज्य आहे. पाणी पुरत नसल्यामुळे रहिवाशांना नाइलाजाने दामदुप्पट पैसे देऊन माफियांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. याबाबत पालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु पाणी माफियांच्या विरोधात कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत.

तुषार सालियन, आंबेडकर नगर, कफ परेड

याच भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूखंडावर झोपडपट्टी उभी राहिली होती. त्यामुळे या परिसराला गलिच्छ रूप आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक वेळा झोपडपट्टी हटवली. पण वारंवार तेथे झोपडय़ा उभ्या केल्या जात होत्या. अखेर झोपडय़ा हटविल्यानंतर आमच्या सोसायटीने या भूखंडाभोवती तारेचे कम्पाऊंड उभारले. मात्र पालिकेने तिथून जाणारा नाला मोठा केल्यानंतर त्यावर एक पूल बांधला. या पुलामुळे पुन्हा झोपडपट्टीवासीयांनी आपले बस्तान या भूखंडावर बसविले आहे. अनेक वेळा पालिकेकडे तक्रारी करूनही पूल जैसे थे आहे.

सुरक्षणा चौघुले, कफ परेड असोसिएशन

पूर्वीच्या नगरसेवकाने पायवाटांवर बसविलेल्या लाद्या उखडून परत बसविल्या, एकाद दुरुस्ती झाली असताना पुन्हा शौचालयांची दुरुस्ती करायची अशी कामे दर निवडणुकीत निवडून येणारे नगरसेवक करीत असतात. झालेल्या कामांवर पालिकेच्या पैशांची उधळपट्टी करण्याची परंपरा येथे कायम आहे. विकासाची मोठी योजना राबविण्यासाठी एकाही नगरसेवकाने पुढाकार घेतलेला नाही.

प्रकाश तांडेल, बधवार पार्क