मुंबई विमानतळाचा नवीन विक्रम

मुंबई विमानतळावर २४ तासांमध्ये एकाच धावपट्टीवरून सर्वाधिक १,००४ विमानांचे लॅंडिंग व टेक ऑफ करण्याचा जागतिक विक्रम झाला आहे .

त्यामुळे याआधी मुंबई विमानतळाच्याच नावावर असलेला १,००३ विमानांचे लॅंडिग व टेक ऑफचाही विक्रम मोडित निघाला. वेळापत्रकाशिवाय असलेल्या विमान सेवांची (नॉन शेडय़ूल)वाढलेली संख्या आणि उदयपूर येथे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या लग्नपूर्व समारंभासाठी मुंबईतून आठ खासगी (चार्टर) विमानांची केलेली सोय, यामुळेच नव्या विक्रमात भर पडली.

दिल्ली, दुबई, न्यूयॉर्क यासह अन्य काही शहरांमध्ये दोन किंवा अधिक धावपट्टीवरून विमानांचे लॅंडिंग व टेक ऑफ केले जाते. मुंबईतही दोन धावपट्टया आहेत. परंतु त्या एकमेकांना छेदून जातात.

त्यामुळे मुख्य अशा एकाच धावपट्टीचा वापर केला जातो. मुंबई विमानतळावरून दर तासाला ४६ विमान सेवांची हाताळणी केली जाते. जेव्हा गर्दीचा काळ असतो, तेव्हा यांची संख्या वाढते आणि तासाला ५२ विमान सेवा हाताळल्या जातात. शनिवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत २४ तासांत मुंबई विमानतळावर १,००४ विमान सेवा हाताळल्या गेल्या. यामध्ये ९०३ विमान सेवा वेळापत्रकातील, तर ५९ सेवा वेळापत्रकात नसलेल्या (नॉन शेडय़ूल), ३१ मालवाहतूक, तीन विमान लष्कराची होती.

याशिवाय उदयपूर येथे मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या लग्नपूर्व समारंभ सोहळा असल्याने मुंबईतून आठ खासगी (चार्टर) विमानांची सोय करण्यात आली होती. त्यामुळे या विमानांची भर पडल्यानंतर १,००४ विमान सेवा हाताळल्याच्या नव्या विक्रमाची नोंद झाली.