दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याच्या आरोपावरून मुंबई हल्ल्यातील सूत्रधार व लष्कर ए तोयबाचा कमांडर झाकी उर रहमान लख्वी याला शनिवारी पाकिस्तानात अटक करण्यात आली.

लख्वी हा २०१५ मध्ये मुंबई हल्ला प्रकरणात जामिनावर सुटला होता. पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाने लख्वी याला अटक करून कुठे ठेवले आहे त्याचा ठावठिकाणा मात्र सांगितलेला नाही. दहशतवादविरोधी विभागाने पंजाबमध्ये गुप्तचरांच्या मार्फत मोहीम राबवली होती. त्यात लख्वी हा दहशतवादाला अर्थपुरवठा करीत असल्याचे निष्पन्न झाले होते.
दहशतवादविरोधी विभागाने म्हटले आहे की, लख्वी हा दहशतवादासाठी गोळा केलेल्या पैशातून दवाखानाही चालवत होता. तो व इतरांनी या डिस्पेन्सरीच्या माध्यमातून आणखी पैसा जमवला व नंतर तो पुन्हा दहशतवादाकडे वळवला होता. यातील काही निधी त्याने व्यक्तिगत खर्चासाठी वापरला होता.

करडय़ा यादीमुळे कारवाई?

‘एफएटीएफ’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कारवाईत पाकिस्तानला सध्या करडय़ा यादीत टाकले आहे, त्याचे पाकिस्तानात दहशतवादाला अर्थपुरवठा हे एक प्रमुख कारण आहे. करडय़ा यादीत टाकले गेल्यानंतर पाकिस्तानला जागतिक बँक व नाणेनिधीची मदत मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पाकिस्तानने लख्वी याच्यावर अटकेची कारवाई केली असावी असा अंदाज आहे.

झाले काय?

लाहोर येथील पोलीस ठाण्यात दहशतवादविरोधी विभागाने दाखल केलेल्या तक्रारीवरून लख्वी (वय ६१) याला अटक करण्यात आली. लख्वी हा लष्कर ए तोयबाचा कमांडर असून त्याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी जाहीर केले आहे. लख्वीला अटक करून कोठे ठेवले, याबाबतचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. त्याच्यावरील खटल्याची सुनावणी लाहोर येथील दहशतवादविरोधी न्यायालयात होणार आहे.