करोना विषाणूचा सामना करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली समोर आलं आहे. मुंबईत बँकेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला ऑनलाईन दारु मागवणं चांगलच महागात पडलं आहे. आपल्या क्रेडीट कार्डाचे डिटेल्स टाकल्यामुळे या कर्मचाऱ्याच्या खात्यातून चोरट्यांनी ८२ हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केली आहे. महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी दारुच्या ऑनलाईन विक्रीला मान्यता दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हा कर्मचारी चांदिवली परिसरातील रहेजा विहार या सोसायटीत राहतो. ४५०० किमतीची दारु मागवल्यानंतर बिल भरताना क्रेडीट कार्डाचे डिटेल्स टाकल्यामुळे या कर्मचाऱ्याच्या खात्यातून चोरट्यांनी रक्कम लंपास केली. आपल्या खात्यातून पैसे काढले जात असल्याचं समजताच या कर्मचाऱ्याने बँकेच्या कस्टमर केअरला फोन करुन आपलं कार्ड ब्लॉक केलं, ज्यामुळे या कर्मचाऱ्याने ३९ हजार ५०० रुपये वाचले आहेत. पवई पोलिस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

बँक कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पवई परिसरात ऑनलाईन दारु कुठे मिळते याचा तो शोध घेत होता. किंग्ज वाईन शॉप बद्दल माहिती मिळताच, फेसबूकवरुन त्यांचा नंबर शोधत कर्मचाऱ्याने दारुची ऑर्डर दिली. समोरील व्यक्तीने या कर्मचाऱ्याला ऑनलाईन पेमेंट करायला सांगत क्रेडीट कार्डाचे डिटेल्स घेतले. ज्या क्षणी मी माझा ओटीपी नंबर शेअर केला, त्याचवेळी माझ्या खात्यातून अंदाजे ८२ हजारांच्या घरात रक्कम काढली गेली. यानंतर आपण हे कार्ड तात्काळ ब्लॉक केल्याचं कर्मचाऱ्याने सांगितलं. अनेकदा मुंबई पोलीस आपल्या बँकेचे किंवा एटीएम कार्डाचे डिलेस्ट कोणासोबतही शेअर करु नका असं सांगत असतात. पवई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.