पनवेलच्या बार मालकाकडे १५ कोटींची लाचमागणी

पनवेलमधील बार मालकाकडून तब्बल १५ कोटींची लाच मागून त्यापैकी सव्वा कोटी रुपये स्वीकारणाऱ्या केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या साहाय्यक आयुक्तासह दोघांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अशोक नायक असे अटक करण्यात आलेल्या साहाय्यक आयुक्ताचे नाव आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाचा(ईडी) एका अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. ‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार बार मालकाला ईडी अधिकारी असल्याचे सांगून नायकला भेटण्यास व तो सांगतो ते करण्यास भाग पाडण्यात आले. तो अधिकारी ईडीचाच आहे का, याबाबत सीबीआय अधिकारी तपास करत आहेत.

सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी तक्रारदार बार मालकाला ईडीने नोटीस बजावली होती. ती मिळताच तक्रारदाराने आवश्यक कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द केली. त्यानंतर या वर्षी एप्रिल महिन्यात ईडीचे साहाय्यक संचालक उमेश कुमार यांची स्वाक्षरी असलेली एक नोटीस तक्रारदाराला मिळाली. या नोटिशीत चौकशीसाठी हजर राहण्याबाबत बजावण्यात आले होते. तब्येत बरी नसल्याने बारमालकाऐवजी त्याचा मुलगा ईडी कार्यालयात हजर राहिला होता. त्यानंतर २९ एप्रिलला ईडी अधिकारी असल्याचे सांगून रणजीत कुमार नावाच्या व्यक्तीने बार मालकाला फोन करून बार मालकाला फोन करून आरोपी नायकला भेटण्यास सांगितले. तसेच नायक जे सांगेल ते कर, अन्यथा अटक अटळ, अशीही धमकी दिली. त्यानुसार तक्रारदार व त्यांचा मुलगा दादरच्या ज्योती हॉटेलमध्ये नायकला भेटले. या भेटीत नायकने १५ कोटींची लाच मागितली. तक्रारदाराने त्यास नकार दिला. तेव्हा रणजीत कुमार या व्यक्तीने पुन्हा फोन करून अटकेची धमकी दिली. बापबेटे पुन्हा नायकला सीमाशुल्क विभागाच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील कार्यालयात भेटले. तेव्हा त्याने लाचेची रक्कम दहा कोटी इतकी कमी केली. मात्र त्यापैकी चार कोटींचा पहिला हप्ता दोन दिवसांत दे, असे बजावले होते.

दरम्यान, लाच देण्याची इच्छा नसल्याने बार मालकाने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीतील तत्थ्यता पडताळून सीबीआयने सापळा रचला. त्यात नायक व्यावसायिकाकडून सव्वा कोटींची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला.

रणजीत कुमारबाबत माहिती मिळवण्यासाठी नायक व शेट्टी या दोघांकडे स्वतंत्रपणे चौकशी सुरू असल्याचे समजते.

अटकेनंतर नायक व शेट्टी या दोघांच्या मुंबईतील निवासस्थानी व कार्यालयात धाड घालून शोधाशोध करण्यात आली. या शोधमोहिमेत अनेक थक्क करणारी, तपासाचा आवाका वाढवणारी कागदपत्रे हाती लागली आहेत, असे सीबीआय प्रवक्ते आर. के. गौर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.