ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा सलग तिसऱ्या दिवशी खोळंबा झाला आहे. कल्याणहून मुंबईकडे येणारी मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. जलद मार्गावरील वाहतुकीवर अधिक परिणाम दिसत आहे. मात्र, वाहतूक विलंबाने असण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही किंवा स्थानकांवर कोणती उद्घोषणाही होत नाहीये. ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. एक दिवसापूर्वीच दिवा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानंतरही मध्य रेल्वेची वाहतूक प्रभावित झाली होती. वारंवार खोळंबा होत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे तर मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात संतापही व्यक्त केला जात आहे.