रेल्वे अपघातांचे सत्र सुरुच असून रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ कर्जतकडे जाणाऱ्या जलद ट्रेनचा डबा रुळावरुन घसरल्याची घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मध्य रेल्वेची वाहतूक मात्र विस्कळीत झाली आहे. अपघाताच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये ५० ते ६० प्रवासी होते.

रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत असतानाच दुपारी लोकल ट्रेनचा डबा घसरल्याने यात भर पडली. सीएसटीएमवरुन कर्जतला जाणाऱ्या जलद ट्रेनच्या मोटरमनचा डबा रुळावरुन घसरला. दुपारी १ वाजून ४४ मिनिटांनी ही घटना घडली. या घटनेच्या वेळी ट्रेनमध्ये ५० ते ६० प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप असून सीएसटीएम स्थानकाजवळच हा अपघात झाल्याने सर्व प्रवासी पुन्हा सीएसटीएम स्थानकावर परतले. रेल्वे अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हार्बर रेल्वेवरील वाहतुकीवर या अपघातामुळे कोणताही परिणाम झालेला नाही असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.लोकल ट्रेन क्रॉसिंगला असल्याने वेगही कमी होता, त्यामुळे अनर्थ टळल्याचे समजते.

ट्रेन रुळावरुन घसरण्याचे सत्र सुरुच असल्याने ९ सप्टेंबर रोजी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी बैठक घेतली होती. बैठकीत जुन्या रेल्वे रुळांमुळे अपघात वाढत असल्याचे कारण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिले होते.