झोपडय़ांचे अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेची शक्कल

मुंबईत पादचाऱ्यांना चालण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पदपथांवर जागोजागी होणारे झोपडय़ांचे अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने नामी ‘शक्कल’ लढवली आहे. या पदपथांवर झोपडय़ांचे अतिक्रमण होऊ नये यासाठी पदपथांवरील अतिक्रमणे हटवून त्या जागी वाहनतळ उभारण्याचा पालिकेचा विचार आहे. यासाठी वाहनचालकांकडून शुल्कवसुलीही करण्यात येणार आहे. त्यामुळे एरवी झोपडय़ांच्या अडथळ्यांमुळे रस्त्यांवरील रहदारीतून वाट शोधणाऱ्या मुंबईकर पादचाऱ्यांना आता पदपथांवरही वाहनांमधून मार्ग काढावा लागणार आहे.

मुंबईमध्ये अनेक ठिकाणच्या पदपथांवर फेरीवाले, झोपडपट्टी दादांनी अतिक्रमण केले आहे. काही ठिकाणी पदपथांवर पथाऱ्या पसरून फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. तर काही ठिकाणी पदपथावरच झोपडय़ा उभारण्यात आल्या आहेत. पदपथावर झोपडी आणि त्यालगत रस्त्यावर खाट, चूल आणि अन्य साहित्य ठेवून पादचाऱ्यांचा मार्ग रोखण्यात आला आहे. चालताना अडथळा निर्माण होत असल्यामुळे पादचारी आणि झोपडपट्टीवासी यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी उडण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे अतिक्रमणे हटवून मुंबईकरांसाठी पदपथ मोकळे करून देण्याची जबाबदारी पालिकेची आहे.

फेरीवाले, झोपडपट्टी आदी अतिक्रमणे हटवून पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे करून देण्याची मागणी करण्याऐवजी भाजपच्या पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांपैकी एक असलेल्या नगरसेविका सरिता पाटील यांनी २६ ऑक्टोबर २०१५ रोजी पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडून पदपथावरील झोपडपट्टी हटवून तेथे सशुल्क वाहनतळ उभारण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार प्रशासनानेही पदपथांवरील झोपडय़ा हटवून तेथे सशुल्क वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

इतकेच नव्हे तर झोपडपट्टय़ांनी अतिक्रमण केलेल्या काही ठिकाणच्या मोठय़ा पदपथांची पालिकेच्या उपप्रमुख अभियंता (वाहतूक) आणि वाहतूक पोलीस (नियोजन) यांनी अलिकडेच पाहणी केली. या पदपथांवर पादचाऱ्यांसाठी पुरेशी जागा सोडून उर्वरित जागेमध्ये सशुल्क वाहनतळ उभारण्यावर पालिका आणि वाहतूक पोलिसांनी शिक्कामोर्तब केले. या पदपथांवर प्रायोगिक तत्त्वावर सशुल्क वाहनतळ सुरू करण्याच्या दृष्टीने पालिकेने पावले टाकण्यास सुरुवात केली असून त्यासाठी ई-स्थळ दरपत्रिका काढण्याची सूचना संबंधित विभागांना करण्यात आली आहे.

मुंबईमधील सार्वजनिक वाहनतळांवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर पालिकेला वचक ठेवता आलेला नाही. असे असताना आता पदपथावर पादचाऱ्यांसाठी जागा सोडून उर्वरित जागेत सशुल्क वाहनतळ उभारण्याचा घाट पालिकेने घातला आहे. त्यामुळे भविष्यात पादचाऱ्यांना वाहनतळांवरील वाहनांच्या अडथळ्याचा सामना करावा लागणार आहे. तसेच पादचाऱ्यांना वाहनतळांवरील उर्मट कर्मचाऱ्यांचा सामना करावा लागणार आहे.

पदपथावर अतिक्रमणे हटवून ते केवळ पादचाऱ्यांसाठी मोकळे करावे, पदपथावर वाहनतळ उभारू नये अशी मागणी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.