मुंबईतील गोरेगावात राहणा-या आणि एका नामांकित परदेशी कंपनीत मोठ्या हुद्यावर कार्यरत असलेल्या श्रीजीत मैती यांना त्यांची पत्नी आणि सासरच्यांनी तब्बल ८४ लाखाला गंडा घातल्याची तक्रार होती. बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाने श्रीजीत यांच्या बाजुने निकाल दिला असून त्यांना बायकोने लुबाडलेले ८४ लाख रुपये परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे वृत्त मिड डे या वृत्तपत्रानं दिले आहे.

श्रीजीत आणि सुदेष्णा यांचं नोव्हेंबर २००४मध्ये लग्न झालं होतं. बंगळुरुमध्ये राहत असताना लग्नानंतर एक वर्षाच्या आतच त्या दोघांमध्ये किरकोळ कारणांवरुन भांडणं सुरु झाली. एका परदेशी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असलेल्या श्रीजीतला त्याच्या कंपनीने काही दिवसांसाठी कामानिमित्त अमेरिकेला पाठवलं. त्यानंतर फेब्रुवारी २०१५मध्ये हे दोघे नवरा-बायको मुंबईत स्थायिक झाले. नव्या शहरात आपल्या संसाराची नव्याने सुरुवात होईल, अशी श्रीजीतची अपेक्षा होती. पण झालं भलतंच. श्रीजीतच्या बायकोच्या म्हणजे सुदेष्णाच्या घरच्यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात लुडबूड करण्यास सुरुवात केली.

१८ डिसेंबर २०१६ या दिवशी दोघांमध्ये भांडण झालं असा आरोप करत सुदेष्णानं मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवर फोन केला आणि नवरा मला मारहाण करत असल्याची, धमक्याा देत असल्याची तक्रार केली. पोलिसांनी त्या दोघांना समजावून सांगितलं आणि आपापसात प्रकरण मिटवा असा सल्ला दिला. पण श्रीजीतविरोधात अदखलपात्र तक्रार दाखल झाली. या घटनेनंतर काही दिवसांतच श्रीजीतपासून विभक्त होण्याच्या उद्देशाने सुदेष्णा नोयडामध्ये तिच्या पालकांकडे निघून गेली. श्रीजीतसोबतचा सर्व संवादही तिने तोडून टाकला.

त्यानंतर २५ डिसेंबर २०१६ रोजी श्रीजीतला एक मोबाईलवर बँकेचा एसएमएस आला की, बायकोसोबत त्याचं जे जाइंट अकाऊंट होतं त्या अकाऊंटचा पासवर्ड बदलण्यात आला आहे, आणि १२ जानेवारी २०१७ रोजी त्या अकाऊंटमधून ८४ लाख रुपये त्यांच्या (श्रीजीत-सुदेष्णाच्या) मुलीच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले. त्यानंतर ही रक्कम सुदेष्णा आणि तिच्या आईच्या (अरुंधती सहा) जॉइंट अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे श्रीजितला आपण संपूर्णपणे आर्थिकदृष्ट्या कंगाल झाल्याचे लक्षात आले.

जून २०१७मध्ये बोरिवलीच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात श्रीजितने याचिका दाखल केली. न्यायालयाने सुदेशना आणि तिचे पालक- तपनकुमार सहा आणि अरुंधती सहा यांच्याविरोधात फसवणुकीचा खटला दाखल करुन घेतला. “सुदेष्णा आणि तिचे आई-वडील यांच्याविरोधात पैसे लुबाडल्याप्रकरणी फौजदारी कारवाई सुरु करण्यात आली आहे. सर्व आरोपींना अटक करावी, असा आदेश न्यायालयाने गोरेगाव पोलिसांना दिला आहे”, अशी माहिती तक्रारदार श्रीजित मैतीच्या वकिल अॅड. इशिता तोलानी यांनी दिली. मिड डे च्या वृत्तानुसार सुदेष्णा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.