मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना महासंचालकपदी बढती देऊन त्यांची बदली केल्यानंतर वेगवेगळी कारणे पुढे करीत सारवासारव करणाऱ्या राज्य शासनाने शीना बोरा प्रकरणाच्या तपासावर मारिया यांचे लक्ष राहील, असे स्पष्ट करून नव्या चर्चेला वाट करून दिली आहे. मात्र शासनाने ही भूमिका घेऊन भाजपचे खासदार आणि माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी केलेल्या वक्तव्याला चपराक दिली आहे. मारिया यांची पीटर मुखर्जी यांच्याशी मैत्री असल्यामुळेच त्यांची बदली झाल्याचे वक्तव्य डॉ. सिंग यांनी केले होते.
राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ हे ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे महासंचालकपद रिक्त होऊन त्या जागी मारिया यांना बढती मिळाली असती. परंतु त्याआधीच मुंबईचे पोलीस आयुक्तपद महासंचालक दर्जाचे करून मारिया यांची उचलबांगडी करून अहमद जावेद यांना नेमण्यात आले.
शासनाच्या या कृतीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. ठाण्याचे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांचीही अशाच रीतीने महासंचालकपदी बढती देऊन अचानक बदली करण्यात आली होती. परंतु त्या वेळी के. पी. रघुवंशी निवृत्त झाल्यामुळे महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे महासंचालकपद रिक्त होते. या वेळी असे पद रिक्त नसतानाही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा दर्जा महासंचालक करण्यात आला.

मारिया रजेवर नाहीत!
तडकाफडकी बदली झालेल्या राकेश मारिया यांनी दुपारी गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदाची सूत्रे स्वीकारली. तसेच ते रजेवर जाणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. राकेश मारिया यांना मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास बदलीचा आदेश मिळाला आणि धक्का बसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. पण ते ही नवीन जबाबदारी स्वीकारायला तयार आहेत. त्यांनी रजेसाठी अर्ज केलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. पीटर मुखर्जी मित्र असल्याच्या आरोपाचाही मारिया यांनी इन्कार केला. या प्रकरणातील तपासाच्या निमित्ताने ते प्रथमच इंद्राणी व पीटरला भेटले होते. शीना बोराचा तपास मारिया पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मारिया यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करताना तत्कालीन सरकारने अहमद जावेद यांना बढती देऊन गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदी नेमणूक अहमद जावेद यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्याची घोषणा करताना बक्षी यांनी जावेद हे तात्काळ कार्यभार स्वीकारतील, असे म्हटले होते. हा आदेश होताच जावेद तातडीने पोलीस आयुक्तालयात आले आणि सूत्रे स्वीकारली.
या साऱ्या घटनाक्रमामुळे अस्वस्थ झालेले मारिया मानवंदना स्वीकारून तातडीने निघून गेले. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. ते रजेवर गेल्याचीही चर्चा काही काळ रंगली होती.

शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर भर देणार आहोत. पुढील आठवडय़ापासून उत्सव सुरू होणार आहेत. त्यामुळे या काळात शांतता रहावी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. महिला आणि बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
-अहमद जावेद, मुंबई आयुक्त

शीना बोरा प्रकरणाच्या तपासावर मारिया यांचीच देखरेख राहील, असे शासनाने ठरविल्याचे बक्षी यांनी सांगितल्यामुळे चर्चेला वेगळेच वळण मिळाले. २२ दिवस शिल्लक असताना त्यांची बदली केली.