माझ्या भावाचा दोष काय, माझ्या मुलाला कोण सांभाळणार असा प्रश्न पूल दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्यांचे नातेवाईक करत होते. सीएसएमटी स्थानकाबाहेर घडलेल्या पूल  दुर्घटनेत डोंबिवलीला राहणारे राजेंद्र शिंदे यांनी आपली पत्नी  गमावली, तर सिराज खान यानी आपला ३२ वर्षांचा मुलगा.

डोंबिवलीला राहणारे राजेंद्र शिंदे यांची पत्नी भक्ती जवळच असलेल्या जीटी रुग्णालयात नर्स होत्या. त्या याच पुलावरून कामाला जात होत्या. त्यांना एक मुलगा असून तो आठवीत शिकत आहे. याच दुर्घटनेत सिराज खान यांनी आपला मुलगा झायेद खानला  (३२) याला गमावले. ते दुर्घटनेतून बचावले. घाटकोपरला राहाणारे खान पिता पुत्र छत्रीचे सामान घेण्यासाठी काळबादेवीला जात होते. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले, माझ्या मुला ऐवजी मला मृत्यू का नाही आला,  असा टाहो ते फोडत होते.

‘मी झवेरी बाजारात कारागिर म्हणून काम करतो आणि कल्याण येथे राहतो मीही पूलावरून जात असताना ही घटना घडली. थोडक्यात वाचलो, असे जखमी सूजय माजी यांनी सांगितले.

‘आम्ही चार जण माझ्या एका सहकाऱ्याला निरोप देण्यासाठी सीएसएमटीला जात होतो. कोलकाताला जाण्यासाठी मुंबई मेल पकडायची होती. पुलावरून जाताना अचानक पूल कोसळला, असे  काळबादेवीला राहणाऱ्या अभिजीत मन्ना यांनी सांगितले.

रेल्वे पकडण्यासाठी सीएसटी जवळील बस थांब्यावर उतरलो. स्थानकात जाण्यासाठी पादचारी पुलाच्या दिशेने दोन पावले टाकली तोच पूल कोसळला. पुलाच्या भागाबरोबर लोकही खाली कोसळले. पुलाखाली रक्ताचा सडा आणि विव्हळणारे जखमी असे चित्र होते.     – राजेश यावलकर, दूरदर्शन आकाशवाणीचे जळगाव प्रतिनिधी