महापालिकेने तयार केलेल्या मुंबईच्या विकास आराखडय़ाचे प्रारूप प्रकाशित करण्यासाठी पालिका सभागृहाने सोमवारी मंजुरी दिली. त्यामुळे या प्रारूपावर सूचना आणि हरकती मागविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 गेल्या आठवडय़ात पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी गटनेत्यांच्या बैठकीत विकास आराखडय़ाचे प्रारूप महापौर स्नेहल आंबेकर यांना सादर केला. प्रशासनाने विभागवार प्रारूप विकास आराखडय़ाचा मसुदा, प्रारूप विकास नियंत्रण नियमावली मसुदा व प्रारूप विकास आराखडय़ासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यास परवानगी मिळावी यासाठी पालिका सभागृहाच्या सोमवारच्या बैठकीत सादर केला होता. त्यास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. प्रारूप प्रकाशित झाल्यानंतर पुढील ६० दिवसांमध्ये जनतेकडून सूचना आणि हरकती मागविण्यात येणार आहेत. सादर झालेल्या सूचना आणि हरकतींचा नियोजन समितीमार्फत विचार करण्यात येणार आहे. त्यानंतर सूचनेनुसार प्रारूपात आवश्यक ते फेरबदल करण्यात येतील. नंतर विकास योजनेचे प्रारूप राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय  घेतील – शेलार
मुंबई : मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखडय़ास अनेकांचा विरोध असून महापालिकेतील सत्ताधारी काय करतात ते पाहू, पण सर्वसामान्य मुंबईकरांच्या हिताचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे भाजप मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. मुंबै बँकेसाठी भाजपचे पॅनेल असून तेच विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विकास आराखडा आणि मुंबै बँकेबाबत अ‍ॅड. शेलार यांनी मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती. विकास आराखडय़ाबाबत अभ्यास करण्यासाठी आमदार पराग अळवणी, योगेश सागर, भालचंद्र शिरसाट, दिलीप पटेल आदींची समिती नेमली असून ते पक्षाला अहवाल देतील. त्यानंतर भाजपची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली जाईल आणि ते योग्य तो निर्णय घेतील, असे शेलार यांनी सांगितले.
मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर हे आता मुंबई भाजपचे उपाध्यक्ष असून त्यांचे पॅनेल हे भाजपचेच आहे. त्याच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील लोकसंख्या, रोजगार, चटईक्षेत्र निर्देशांकाची गरज, वैद्यकीय, शैक्षणिक, अग्निशमन, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, विद्युतपुरवठा यंत्रणा, पोलीस व वाहतूक यंत्रणा आदींचा अभ्यास करून २०१४-२०३४ या २० वर्षांच्या काळातील विकास आराखडय़ाचे प्रारूप तयार करण्यात आले आहे.