कांदिवली दुहेरी हत्याकांड
आंतरराष्ट्रीय ख्यातीची चित्रकार हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरीश भंबानी यांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी फरारी असलेल्या विद्याधर राजभरचा शोध घेण्यासाठी स्थानिक कांदिवली पोलीस ठाणे आणि गुन्हे अन्वेषण विभागाची स्वतंत्र पथके प्रयत्नशील असून या हत्याकांडात सहावा आरोपी असल्याचेही तपासानंतर निष्पन्न झाले आहे. हा सहावा आरोपी कोण आहे, याबाबत काहीही सांगण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला. या सहाव्या आरोपीचाही लवकरच खुलासा होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
विद्याधरच्या अटकेनंतर या हत्याकांडामागील हेतू स्पष्ट होणार आहे. निव्वळ पाच लाखांसाठी विद्याधर हत्या करणे शक्य नाही. यामागे निश्चितच मोठी सुपारी दिली गेली असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. पाच लाखांसाठी विद्याधर हेमाकडे तगादा लावत होता आणि त्यातून त्यांच्यात मारामारी झाली, अशी माहिती पुढे आली आहे. परंतु विद्याधरने जाणूनबुजून हा विषय उकरून काढला. वास्तविक पाच लाखांच्या रकमेवरून त्यांच्यात वाद होता, हे खरे असले तरी हत्येसाठी हे कारण नाही. त्यामागे आणखी वेगळेच कारण असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यामुळे तिचा पती चिंतन याचीही अद्याप चौकशी सुरू असल्याचे या सूत्रांनी सांगितले.
विद्याधरच्या शोधासाठी काही पथके मुंबईबाहेर गेली आहेत. मोबाइलच्या ठावठिकाण्यावरून विद्याधरचा अंदाज बांधला जात आहे. तो मध्य प्रदेशात असल्याचा ठावठिकाणा मिळाला होता. परंतु त्यानंतर त्याचा मोबाइल बंद आहे. आसपासच्या परिसरात तो असण्याची शक्यता गृहित धरून तेथील पोलिसांना सावध करण्यात आले आहे. फक्त हेमाची हत्या करण्याचा डाव होता की वकील भंबानी यांनाही ठार मारायचे ठरले होते, हे विद्याधरच्या अटकेनंतरच स्पष्ट होणार आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या विद्याधरला पाच लाखांपेक्षाही मोठय़ा रकमेचे आमीष दाखविण्यात आले असावे, असाही पोलिसांचा अंदाज आहे.