परळ येथील तोडी मिलमधील नवरंग स्टुडिओमध्ये शुक्रवारी लागलेल्या आगीसंदर्भात अग्निशमन दलाकडून स्टुडिओ मालकाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोणत्याही परवानगीशिवाय तसेच निष्काळजीपणे साठवलेल्या ज्वालाग्राही चित्रफितींमुळे आगीने तीव्र स्वरूप धारण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कमला मिलला आग लागण्याच्या घटनेला महिनाही उलटलेला नसतानाच त्याच्या शेजारीच असलेल्या तोडी मिलमधील नवरंग स्टुडिओच्या चारमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गुरुवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता आग लागली. जुन्या आणि मोडकळीला आलेल्या या इमारतीमधील नवरंग स्टुडिओ अनेक वर्षांपूर्वी बंद झाल्याने तिथे कोणीही व्यक्ती नव्हती. मात्र पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही आग तिसऱ्या पातळीवरची असल्याचे घोषित करण्यात आले.  ही आग विझवण्यासाठी इमारतीजवळ जाण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाडय़ांना जागाच मिळाली नसल्याने आग पसरून परिस्थिती बिकट होण्याची वेळ आली होती.

बारा तासांनंतर आग विझवल्यावर या जागेची पाहणी केली असता तिथे चित्रफितीचा (सेल्युलाइड फिल्म) साठा जळून राख झालेल्या अवस्थेत आढळल्याचे अग्निशमन दलाचे विभागीय अग्निशमन अधिकारी संपत कराडे यांनी ना. म. जोशी पोलिसांकडे केलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे. चित्रफितींसारख्या ज्वालाग्राही वस्तू साठवण्यासाठी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनाअंतर्गत अग्निशमन दलाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र अशी परवानगी घेण्यात आली नव्हती तसेच कोणत्याही अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, असेही तक्रारीत लिहिले आहे. यानुसार पोलिसात नवरंग सिने सेंटर प्रा. लिमिटेडविरुद्ध तक्रारीची नोंद करण्यात आली.

कमला मिलमध्ये आग लागून १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तोडी मिलमधील झपाटय़ाने पसरणाऱ्या आगीमुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे आठ बंब पाठवण्यात आले होते. मात्र चिंचोळ्या जागेमुळे अग्निशमन दलाला इमारतीजवळ जाता येत नव्हते. आग आणखी पसरू नये यासाठी बाजूच्या इंडस्ट्रिअल इस्टेट इमारतीमध्ये जात तेथून पाण्याचे फवारे सोडण्यात आले. सहा तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी साडेसात वाजता आग आटोक्यात आणली गेली. अग्निशमन दलाचा जवान दिनेश पाटील आग विझवताना किरकोळ जखमी झाला.