दरवर्षी पावसाळा आला की मुंबई तुंबणार हे एकप्रकारे ठरलेलच आहे. मात्र पावसाळ्यात मुंबईत येणाऱ्या पुरामुळे येथील कामधंदे ठप्प झाल्याने देशाच्या आर्थिक राजधानीला कोट्यावधींची झळ सोसावी लागत असल्याचे समोर आले आहे. २००५ ते २०१५ या दहा वर्षांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे मुंबईचं तब्बल १४ हजार कोटींचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. युनायटेड स्टेट ट्रेड अॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी (यूएसटीडीए) आणि केपीएमजी या अकांउटींग फर्मने सादर केलेल्या अहवालात हे उघड झाले आहे.

एवढेच नाहीतर पुरामुळे या कालावधीत ३ हजार जणांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये २६ जुलै २००५ मध्ये आलेल्या महापुरातील मृतांचा देखील समावेश आहे. त्या दिवशी मुंबईत अवघ्या २४ तासांत तब्बल ९४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. जो की शतकातील सर्वाधिक पाऊस ठरला होता.

पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत होणाऱ्या नुकसानीची एवढी मोठी आकडेवारी प्रथमच समोर आली आहे. यूएसटीडीए आणि केपीएमजी यांनी २००५ ते २०१५ या दहा वर्षांच्या कालावधीतील पावसावर लक्ष केंद्रीत केले होते. यामध्ये दरवर्षी पावसाळ्यात अनेकदा मुंबई थांबल्याचे आढळून आले. यंदा देखील पावसाने तीनवेळा मुंबईला आपले घुडगे टेकवायला लावले आहेत.

मागील आठवड्यातच समुद्राच्या भरती ओहोटीमुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मिठी नदीला मोठा पूर आला होता. अनेक वर्षात पहिल्यांदाच पश्चिम रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला होता. कुर्लामध्ये परिस्थिती इतकी वाईट होती की पुरात अडकलेल्या तब्बल १५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले होते.

मार्च २०१९ मध्ये महाराष्ट्र मदत व पुनर्वसन विभागाने सुरू केलेल्या अभ्यासात असे आढळले की, प्रमुख पायाभूत सुविधा विकास धोक्याची पातळी क्वचितच विचारात घेतो. त्यामुळेच आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो 3 लाइनसाठी कारशेड तयार करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पर्यावरणप्रेमींकडून जोरदार विरोध केला जात आहे. कारण या कारशेडमुळे या परिसरातील केवळ २७०० पेक्षा अधिक झाडांची कत्तल होणार नाही तर मिठी नदीच्या प्रवाहात वाढ होऊन पूर्वीपेक्षा जास्त पूर येण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. अहवलात असे देखील म्हटले आह की, दुर्घटना प्रवण क्षेत्र अद्यापही निश्चित करण्यात आलेली नाहीत.