डोंगरी परिसरातील केसरबाई इमारतीला जोडून उभारलेले चार बेकायदा मजले मंगळवारी सकाळी कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाकडून (एनडीआरएफ) रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.

डोंगरीतील केसरबाई ही मूळ इमारत ९० वष्रे जुनी आहे. रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ इमारत इंग्रजी ‘एल’ आकाराची होती. त्यात चार मजली इमारत, त्यापुढे एक मजला आणि त्यावर गच्ची अशी मूळ रचना होती. इमारतीतील एका रहिवाशाने दादागिरी करत विश्वस्तांना धमकावून १५ वर्षांपूर्वी या गच्चीवर तीन बेकायदा मजल्यांचे बांधकाम केले. हे बांधकाम करताना पाया आणखी भक्कम करण्यात आला नव्हता. हे बेकायदा मजले मंगळवारी कोसळले.

दुर्घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. ढिगारा उपसण्यासाठी इमारतीसमोरील तांडेल क्रॉस लेनमध्ये रहिवाशांनी मानवी साखळी केली. त्यानंतर अडीच तासांनी पोहोचलेल्या ‘एनडीआरएफ’ने बचावकार्याची सूत्रे हाती घेतली. मात्र, ढिगारा हटविण्यासाठी त्या इमारतीजवळ जागाच नसल्याने ‘एनडीआरएफ’ला मानवी साखळीवरच अवलंबून राहावे लागले. ढिगाऱ्याखालून काढलेल्या व्यक्तींना जेजे रुग्णालय आणि हबीब रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत.

रात्री आठ वाजताच्या सुमारास बचावपथकाने इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंतचा ढिगारा उपसला. तळमजल्यावर काही दुकानांबरोबरच जरीचा कारखाना होता. या कारखान्यात सकाळी किती कामगार काम करत होते, याचा अंदाज कोणालाही नाही. तसेच इमारतीसमोरील चिंचोळ्या तांडेल क्रॉसलेनवरून येणारे-जाणारे पादचारी ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती आहे.

ही इमारत बाई हिराबाई रहिमभाई अलू परू अ‍ॅण्ड केसरबाई धरमसी खाकू चॅरिटेबल अ‍ॅण्ड रिलिजस ट्रस्टच्या मालकीची आहे. या ट्रस्टच्या अन्य तीन इमारती याच भागांत असून एक इमारत माहीम येथे आहे. एच. करमाळी, बरकत उनीया आणि अली श्रॉफ विश्वस्त आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.

तूर्तास अपघाती मृत्यूची नोंद

केसरबाई इमारत अपघातप्रकरणी डोंगरी पोलिसांनी तूर्तास अपघाती मृत्यूची नोंद करत जखमींचे जबाब नोंदवण्यास सुरूवात केली आहे. सध्या ढिगारा उपसून त्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढणे, त्यांचा जीव वाचवणे यास प्राधान्य दिले जात आहे. बचावकार्य संपल्यानंतर विविध शासकीय यंत्रणा अपघाताचे कारण शोधून काढतील. त्यानंतर अपघाताला जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे या विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

मृतांचा आकडा जाहीर करण्याची गृहनिर्माणमंत्र्यांना घाई

बचावकार्याला सुरूवात झालेली असतानाच गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जाहीर करून मोकळे झाले. तोपर्यंत रुग्णालयांत सहा जखमींवर उपचार सुरू होते आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढणे बाकी होते. विखेंच्या चुकीच्या माहितीमुळे सर्वत्र संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

मृतांची नावे

जावेद इस्माईल (३४), साबिया नासीर शेख (६०),  अब्दुल सत्तार कालू शेख  (५५),  मुझम्मिल मन्सूर सलमानी (१५), सायरा रिहान शेख (२०), अरहन शेहजाद (४०), कश्यप्पा अमीराजान (१३), सना सलमानी (२५), झुबेर मन्सूर सलमानी (२०), इब्राहीम (दीड वर्ष)

जखमींची नावे

फिरोज सलमाना (४५), झीनत रेहमान (३०), आयेशा शेख (४), अब्दुल रेहमान (३), नावेद सलमान (३०), इम्रान हुसेन कलवानी (३०), सलमा अब्दुल शेख (४५), साजिदा शहजाद जरीवाला (५८) यांच्यासह तीन वर्षांचा अनोळखी मुलगा.