सामूहिक बलात्काराच्या संकटांनंतर त्याने तिला सावरले. तिच्याशी लग्न करून जीवनभरासाठी आधाराचे वचन दिले. पण तिच्यावर त्याच्यापासून विभक्त होण्याची वेळ आली आहे. तिच्या आईने या संकटाला त्याला जबाबदार धरले आणि तिला त्याच्यापासून वेगळे केले. ही शोकांतिका आहे ३१ जुलैला शक्ती मिलमध्ये सामूहिक बलात्काराची बळी ठरलेल्या टेलिफोन ऑपरेटर तरुणीची.
 तो २२ वर्षांचा आणि ती जेमतेम १९ वर्षांची. एका कॅटरींग सव्र्हिसमध्ये एकत्र काम करताना दोघांचे प्रेम जुळले होते. दोन वर्षांत त्यांचे प्रेम बहरले होते. पण तिच्या आईचा या प्रेमसंबंधास विरोध होता. पण त्यांचे लपून भेटणे सुरूच होते. ३१ जुलैला ते असेच भेटले आणि शक्ती मिलच्या परिसरातून जात असताना त्यांच्यावर तो दुर्देवी प्रसंग ओढावला. पाच आरोपींनी त्याला मारहाण करून त्याच्यासमोरच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मात्र याही परिस्थितीत त्याने तिला वाऱ्यावर न सोडता तिच्याशी लग्न केले. महिनाभर छत्तीसगढला राहून ते परत मुंबईला आले.
त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्याच्या कुटुंबियांनी या लग्नास मान्यता दिली आणि जोडप्याचा स्वीकार केला. पण एवढे मोठे संकट कोसळूनही तिच्या आईवर काहीही परिणाम झालेला नव्हता. तिच्या आईचा या संबंधाला आजही विरोध आहे. आईने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून फेकले आणि तिला आपल्याच घरी ठेवले. मुलाशी संपर्क करू नये, म्हणून तिचा मोबाइलही तिने काढून घेतला. हे संकट त्या मुलामुळेच आला. त्यामुळे त्याच्यापासून दूर रहा. हे लग्न मला मान्य नाही, असे तिने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे प्रकरण दडपण्यासाठी आईने मुलीला बजावले होते. पण मुलीने पोलिसांसमोर धाडस करून सांगितले आणि हा प्रकार समोर आला. या कठीण प्रसंगात तिला त्याची गरज आहे. मात्र आईच्या विरोधामुळे ते दोघे पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत.