अधिसूचनेमध्ये बदल करण्याची मुंबई ग्राहक पंचायतीकडून मागणी

ग्राहक व्यवहार विभागाकडून हॉटेल बिलांवरील सेवा आकाराबाबत काढण्यात आलेल्या नव्या अधिसूचनेबाबत ग्राहकांमध्ये नाराजीचे व गोंधळाचे वातावरण आहे. सेवा आकार देणे ग्राहकांनी बंधनकारक नसून ऐच्छिक आहे असे एकीकडे या अधिसूचनेत म्हटले असताना दुसरीकडे सेवा आकार हॉटेलच्या बिलात जोडण्याचे अधिकार हॉटेल मालकांना असतील असेही यात नमूद करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांचे हित साधले जात नसल्याबद्दल मुंबई ग्राहक पंचायतीने या अधिसूचनेत फेरबदल करावेत अशी मागणी करत ज्या ग्राहकांना सेवा आकारासह हॉटेलची बिले आली आहेत ती पंचायतीला सादर करण्याचे आवाहन केले आहे.

हॉटेलमध्ये बिलावर सेवा आकार आकारण्याचे अधिकार हॉटेल मालकांना देतानाच ते भरण्याचे अथवा नाकारण्याचे अधिकार ग्राहकांना नव्या अधिसूचनेप्रमाणे देण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. तसेच, अनेक हॉटेल मालकांकडून ज्यादा रक्कम सेवा आकाराच्या नावाखाली ग्राहकांकडून वसूल केली जाते. हॉटेल बिलावरील मूळ रकमेच्या ५ ते २० टकके रक्कम सेवा आकाराच्या नावाखाली घेतली जात असल्याचेही काही ग्राहकांचे म्हणणे आहे. तसेच, ही सेवा आकाराच्या नावाखाली घेतली गेलेली रक्कम ही हॉटेल कर्मचाऱ्यांच्या उपयुक्ततेसाठी वापरली जात नसल्याची अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे यात ग्राहकांचे हित नसल्याने मुंबई ग्राहक पंचायतीने या अधिसूचनेत बदल करून हॉटेल चालकांकडील सेवा आकार आकारण्याचा अधिकार काढून घेण्याची मागणी केली आहे.

आजवर ज्या-ज्या ग्राहकांना सेवा आकारासह बिले आली आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी पंचायतीने ग्राहकांकडून सेवा आकारासह आलेली बिले मागविली आहेत. ज्या ग्राहकांना सेवा आकारासह बिले आली आहेत त्यांनी ९९८७५५५६६५ या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून पाठवावीत असे आवाहन ग्राहक पंचायतीने केले आहे.