|| प्रसाद रावकर

स्वच्छ भारत अभियान; मलजल प्रक्रिया केंद्रातून सोडलेल्या पाण्यात घातक घटकांचा अडसर

मुंबई : मलजल प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया करून अपेक्षेनुसार मलजल आणि सांडपाणी समुद्रात सोडण्यात येत नसल्यामुळे स्वच्छ भारत अभियानात पुन्हा एकदा मुंबईवर नामुष्की ओढवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

काही वर्षांपूर्वी जागोजागी फिरती आणि पक्की शौचालये उपलब्ध करून पालिकेने मुंबई हागणदारीमुक्त असल्याचा किताब पदरात पाडून घेतला. मात्र आता समुद्रात सोडण्यात येणारे मलजल आणि सांडपाण्यात घातक घटकांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळल्याने मुंबईला ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या स्पर्धेतील पंचतारांकित शहरांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळणे अवघड बनले आहे.

काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’तील स्वच्छताविषयक स्पर्धेत मुंबई हागणदारीमुक्त व्हावी यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली होती. झोपडपट्टय़ा, वस्त्यांबाहेर फिरती शौचालये उपलब्ध करण्यात आली होती. तसेच अनेक ठिकाणी पक्की शौचालये बांधण्याची कामेही सुरू करण्यात आली होती. नागरिकांनी उघडय़ावर प्रात:र्विधी उरकू नयेत यासाठी पालिकेकडून निरनिराळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या उपाययोजनांची दखल घेत मुंबई हागणदारीमुक्त असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता या अभियानात हागणदारीमुक्तीच्या पुढच्या टप्प्याचा समावेश करण्यात आला आहे. शहरातील मलजल, सांडपाणी कशा पद्धतीने समुद्रात सोडले जाते; मलजल, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरण्यात येते आदींचा विचार ‘स्वच्छ भारत अभियाना’त करण्यात आला.

पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे एक पथक मुंबईत दाखल झाले होते. या पथकाने वर्सोवा, भांडुप, मालाड आणि घाटकोपर येथील मलजल प्रक्रिया केंद्रामधून प्रक्रियेअंती समुद्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने घेतले आणि त्यांची तपासणी करण्यात आली होती.  ‘स्वच्छ भारत अभियाना’तील निकषांनुसार मलजल प्रक्रिया केंद्रांमध्ये प्रक्रिया करून समुद्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यातील घातक घटक कमी असावेत अशी अट घालण्यात आली होती. पथकाने घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता वर्सोवा, भांडुप, घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्रातून प्रक्रियेअंती सोडलेल्या पाण्यातील घातक घटकांचे प्रमाण निकषाच्या आसपास असल्याचे आढळून आले होते. मात्र मालाड मलजल केंद्रातून प्रक्रियेअंती समुद्रात सोडण्यात आलेल्या पाण्यात घातक घटकांचे प्रमाण प्रचंड असल्याचे निदर्शनास आले होते.

झाले काय?

‘स्वच्छ भारत’मधील स्वच्छताविषयक स्पर्धेस शहरांना तारांकन देण्याची जबाबदारी संबंधित महापालिकांवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेने मुंबई पाच तारांकन असलेल्या शहरांच्या पंक्तीत बसू शकेल असे कळविले होते. त्यासाठी मलजल आणि सांडपाण्यावर योग्य ती प्रक्रिया करून समुद्रात पाणी सोडणे गरजेचे होते. परंतु मालाड येथील मलजल प्रक्रिया केंद्रातून समुद्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यात घातक घटकांचे प्रमाण अधिक असल्याचे चाचणीअंती (बीओडी चाचणी) उजेडात आले आहे. त्यामुळे पाच तारांकन मिळविणाऱ्या शहरांच्या पंक्तीत बसण्यासाठी आवश्यक असलेल्या अटीची पूर्तता करण्यात मुंबई अपयशी ठरली आहे. परिणामी, पाच तारांकन असलेल्या शहरांच्या पंक्तीत बसण्याचा मान मुंबईला मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

अटींची पूर्तता नाही..

मालाड येथील मलजल प्रक्रिया केंद्र १९९८ मध्ये उभारण्यात आले असून या केंद्रातून प्रक्रियेअंती सोडण्यात येणाऱ्या पाण्यातील घातक घटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२२ पर्यंतची वेळ पालिकेला दिली आहे. ही बाब पालिकेने ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र अटीची पूर्तता होत नसल्याने त्यात सूट देण्यास अभियानाचे अधिकारी तयार नसल्याचे समजते.

मुंबईला ‘ओडीएफ +’ मानांकन मिळाले असून मालाड मलजल प्रक्रिया केंद्रातील तांत्रिक अडचणींमुळे ‘ओडीएफ ++’ मानांकन नाकारले आहे. या संदर्भात केंद्राकडे फेरतपासणीसाठी पाठपुरावा सुरू आहे.   – किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, मुंबई महानगरपालिका