सोमवारी मुंबईत ८०४ नवीन रुग्णांची नोंद झाली तर, ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या दोन्ही कमी झाल्यामुळे मुंबईत आशादायक चित्र निर्माण झाले आहे. गेल्या दोन महिन्यांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद सोमवारी झाली आहे. तसेच गेल्या दीड महिन्यातील सर्वात कमी मृतांची नोंद झाली आहे.

सप्टेंबर महिन्यापासून मुंबईतील रुग्णांची संख्या सतत वाढतच होती. रुग्णवाढीचा वेग कमी झालेला असला तरी दर दिवशी हजारांच्या पुढे रुग्णांची नोंद होते आहे. ऑगस्टमध्ये मुंबईतील रुग्णसंख्या कमी होऊ लागलेली असतानाच सप्टेंबरपासून रुग्ण आणि मृतांची संख्या पुन्हा वाढू लागली होती. मात्र सोमवारी २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आशादायक चित्र निर्माण झाले आहे. २५ ऑगस्टला ५८७ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर दर दिवशी वाढणारी रुग्णसंख्या सोमवारी प्रथमच हजारांच्या आत आली आहे. तर १४ सप्टेंबरला एका दिवसात ३१ रुग्णांचे मृत्यू झाले होते. त्यानंतर दर दिवशी मृतांचा आकडाही ४५ ते ५० च्या दरम्यान होता. गेल्या दीड महिन्यानंतर प्रथमच एका दिवसातील मृतांची संख्या कमी झाली आहे.

सोमवारी १२९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २,२१,४५८ म्हणजेच ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आणखी वाढून १३२ दिवसांवर गेला आहे. सध्या १९,०३५ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी २०३४ रुग्ण बोरिवलीत आहेत.