आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेच्या ‘शिव आरोग्य सेवा’ योजनेशी स्पर्धा करण्यासाठी किंवा प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने ‘मुंबईकर आरोग्य सेवा अभियान’ योजनेची घोषणा केली आहे. पुढील तीन महिन्यांत ५० हजार मुंबईकरांवर खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी सांगितले.

ही योजना बुधवारपासून राबविली जाणार असून कर्करोग, हृदयरोग यासह २५ हून अधिक मोठय़ा आजारांवर निदान, शस्त्रक्रिया व अन्य मदत या अभियानात मोफत दिली जाईल. भाजपचे मुंबईतील खासदार, आमदार, नगरसेवक आणि प्रभाग स्तरावरील सर्व पदाधिकारी या अभियानात सहभागी होणार आहेत, असे अ‍ॅड. शेलार यांनी सांगितले.