आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी चंद्रशेखर गुप्ता (२५) या तरुणाला ठाणे सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केली. ठाण्याच्या संतोष पाटील नगरमध्ये डिसेंबर २००९ मध्ये ही घटना घडली होती.
बेपत्ता झालेल्या या मुलीचा मृतदेह सापडला होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी गुप्ता याच्यासोबत तिला पाहिल्याचे तिच्यासोबत खेळणाऱ्या मैत्रिणींनी सांगितले आणि पोलिसांनी त्या आधारे त्याला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी सादर केलेले साक्षीपुरावे मान्य करीत गेल्या वर्षी मे महिन्यात ठाणे सत्र न्यायालयाने गुप्ताला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.
न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी आणि न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर गुप्ता याच्या अपिलावर सुनावणी झाली. शुक्रवारी न्यायालयाने तपशिलवार निकालपत्र तयार नसल्याने त्याची फाशी रद्द करीत असल्याचे न्यायालयाने जाहीर केले.