मुंबई हायकोर्टाने एका NRI महिलेला स्काईप या व्हिडिओ चॅटिंग अॅपद्वारे घटस्फोट घेण्यास संमती दिली आहे. सोशल मीडियावर हे अॅप व्हिडिओ चॅटिंगसाठी सर्रास वापरले जाते. मात्र घटस्फोट घेण्यासाठी भारतात या अॅपचा बहुदा पहिल्यांदाच प्रयोग होत असावा.

अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला होता. हा अर्ज सुरुवातीला न्यायमूर्ती भारती ड्रांग्रे यांनी फेटाळला होता. कोर्टात ही महिला व्यक्तीशः हजर राहू शकत नाही असे कारण त्यांनी दिले होते. मात्र त्यानंतर स्काईप या चॅटिंग अॅपद्वारे या महिलेला घटस्फोट घेण्यास संमती देण्यात आली. या प्रकरणी पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे विशेष अधिकार देऊन या महिलेच्या वडिलांना कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. तर या महिलेचे म्हणणे स्काइपवरून ऐकले जाणार आहे.

ग्लोबलायझेशन आणि नोकरीच्या संधी बाहेर असल्याने अनेक तरूणांना अर्ज दाखल करण्यासाठी व्यक्तीशः कोर्टात हजर राहता येत नाही. हाच मुद्दा लक्षात घेऊन आम्ही स्काइप या चॅटिंग अॅपद्वारे घटस्फोट घेण्यास संमती देतो आहेत असे म्हटले आहे. टाइम्स नाऊने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

ज्या एनआरआय महिलेला घटस्फोट हवा आहे तिचे आणि तिच्या पतीचे लग्न २००२ मध्ये झाले होते. मात्र एकमेकांमध्ये झालेल्या मतभेदांमुळे २०१६ पासून हे दोघेही विभक्तपणे राहतात. २०१६ नंतर ही महिला अमेरिकेला गेली. या दोघांनीही गेल्या वर्षी घटस्फोटासाठी फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केला होता.