महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्यावहिल्या गुढीपाडवा मेळाव्याला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. मेळाव्यामुळे ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी आयोजकांनी घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
शिवाजी पार्कचा परिसर शांतता क्षेत्र असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला कशी काय परवानगी देण्यात आली, असा प्रश्न मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला होता. त्याचबरोबर बुधवारी आपली बाजू मांडण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सरकारने बाजू मांडल्यावर न्यायालयाने ध्वनिप्रदूषण होऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश आयोजकांना दिले.
येत्या शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा पहिलावहिला गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात येते आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे स्वतः या मेळाव्यामध्ये उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. या मेळाव्यासाठी लाऊडस्पीकर लावण्यात येणार आहेत. शिवाजी पार्कचा परिसर शांतता क्षेत्र असताना तिथे लाऊडस्पीकर लावण्याला परवानगी कशी काय देण्यात आली, याचा खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते.