News Flash

स्टिकरचा गैरवापर करणाऱ्यांवर गुन्हा

विश्वास नांगरे पाटील यांच्याशी केलेली बातचीत.

विश्वास नांगरे पाटील, मुंबईचे सहपोलीस आयुक्त

आठवडय़ाची मुलाखत –  विश्वास नांगरे पाटील, मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था)

कठोर निर्बंध लागू झाल्यानंतरही मुंबईतील वाहनांची पूर्वीइतकीच रहदारी सुरू आहे. शहरातील काही भागांत नित्यनेमाने वाहतूक कोंडीही होत आहे. अनावश्यक किंवा परवानगी नसताना प्रवास करणाऱ्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी रंगीत पास योजना सुरू केली आहे. त्या योजनेबाबत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, दुकानदारांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यानिमित्ताने मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्याशी केलेली बातचीत.

*  वाहनांसाठी कलर कोडिंगसुरू करण्यामागील हेतू काय?

कठोर निर्बंधांमध्येही वाहने मोठय़ा संख्येने रस्त्यांवर उतरली. प्रत्येक वाहन तपासून पुढे सोडणे निव्वळ अशक्य होते. वाहनांच्या गर्दीत अत्यावश्यक सेवा विशेषत: आरोग्य सेवेतील डॉक्टर, रुग्णवाहिका, वैद्यकीय उपकरणे, प्राणवायू वाहून आणणाऱ्या वाहनांचा खोळंबा होऊ लागला. हे लक्षात आल्यावर प्रवासास मुभा असलेल्या सेवांची तीन रंगांमध्ये वर्गवारी करण्याची कल्पना पुढे आली. ही योजना सुरू होताच रस्त्यांवरून सुमारे ४० टक्के वाहनांची रहदारी कमी झाली. लाल, हिरवा किंवा पिवळा स्टीकर नसलेली वाहने टिपून चौकशी, झाडाझडती घेणे सोपे झाले. दुसरे असे की प्रत्येक गाडी थांबवून व्यक्तिश: चौकशी केल्याने दोन्ही बाजूंनी संसर्ग प्रसाराचा धोका होता. तोही कमी झाला.

*  रंगीत स्टीकर कोण देणार? आणीबाणीच्या परिस्थितीत प्रवास करणे भाग पडल्यास कोणता स्टीकर लावावा? असे संभ्रम नागरिकांमध्ये कायम आहेत.

हे स्टीकर घरच्या घरी तयार करता येतील. घरात या रंगाचा उपलब्ध कागदाचा वर्तुळ कापून घ्यावा आणि वाहनांच्या मागील व पुढच्या बाजूस चिकटवणे अपेक्षित आहे. मुळात ही व्यवस्था निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या सोयीच्या दृष्टीने करण्यात आली आहे. हे स्टीकर वाहनांच्या नोंदणी क्र मांक पाटय़ांप्रमाणे प्रमाणित असावेत, ते पोलिसांकडूनच घ्यावेत, असे बंधन बिलकूल नाही. सर्वसामान्य नागरिक वैद्यकीय आणीबाणी किंवा अन्य अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडल्यास, त्यांनी प्रवास केल्यास पोलीस कोणताही अडथळा आणणार नाहीत. प्रवासाच्या निमित्ताची खातरजमा झाल्यास कारवाईही केली जाणार नाही.

*  रंगीत स्टीकर लावलेल्या वाहनांसाठी काही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे का?

होय, लाल रंगाचा स्टीकर लावलेली वाहने महत्त्वाची असून त्यांना प्रवासात प्राधान्य देण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर शहरातील काही मार्गावर करण्यात आली आहे.

*   बाहेरून मुंबईत येणाऱ्या वाहनांनाही हे रंगीत स्टीकर लावावे लागतील?

निश्चितच, कलर कोडिंगबाबतचे आदेश फौजदारी दंड संहितेतील कलम १४४ नुसार मुंबईच्या हद्दीत लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य शहरे, राज्यांतून मुंबईत येणाऱ्या वाहनांनी वर्गवारीनुसार हे रंगीत स्टीकर लावणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास या वाहनांचा, प्रवाशांचा खोळंबा होऊ शकेल.

*  रंगीत स्टीकरचा गैरफायदा घेणारे कसे शोधाल?

कोणी प्रवास करावा, करू नये याबाबत नियम जारी करण्यात आले आहेत. हे नियम पाळण्याची जबाबदारी नागरिकांवरही आहे. मुभा असलेल्या कोणत्याही वर्गात नसताना रंगीत स्टीकर लावून प्रवास करणाऱ्यांवर फसवणुकीसह अन्य कायद्यांनुसार गुन्हा नोंदवला जाणार आहे. रंगीत स्टीकर नसलेल्या वाहनांची चौकशी होईलच, पण स्टीकर असलेल्या वाहनांचीही अधूनमधून चौकशी करण्यात येईल. गेल्या दोन दिवसांत काही ठिकाणी अशी चौकशी करण्यात आली. त्यातून आरोग्य सेवेशी संबंधित नसलेल्यांनी आपल्या वाहनावर लाल रंगाचा स्टीकर लावल्याचे आढळले तर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.

 

*  पोलीस दलात करोना संसर्ग पसरू नये, करोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत?

बाधा होऊ नये यासाठी मुखपट्टी, सॅनिटायझर, फेसशिल्ड आदींच्या वापराबाबत सर्व पोलीस ठाण्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन लाख रुपये सॅनिटायझर, फेसशिल्डसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. शहरातील पाच अतिरिक्त आयुक्त कार्यालयांमध्ये करोना मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. बाधितांना वेळेत उपचार मिळावेत, आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात याची खबरदारी घेतली जात आहे.

मुलाखत : जयेश शिरसाट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 1:15 am

Web Title: mumbai joint commissioner of police vishwas nangre patil interview zws 70
Next Stories
1 प्राणवायूच्या छोटय़ा बाटल्यांच्या खरेदीसाठी धाव
2 पालिकेचे २०१ कर्मचारी मृत्युमुखी
3 कुठे चोख नियोजन, कुठे बेफिकिरी!
Just Now!
X