मुंबईच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे मार्गासह हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मात्र आज ब्लॉकपासून दिलासा मिळाला आहे. या मार्गावर रात्री ब्लॉक घेऊन डागडुजीचे काम उरकण्यात येत आहे.

ब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर मार्गावर लोकल फेऱ्या सुमारे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावणार आहेत.  कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी 10 वाजून 48 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 51 मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉककाळात अप धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर, हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते 3.40 वाजेपर्यंत ब्लॉक आहे. ब्लॉककाळात अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. कुर्ला, प्लॅटफार्म क्रमांक ८वरून पनवेलकरिता विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे हार्बर रेल्वेवरील वाहतूक विलंबाने धावणार आहे.