मुंबई आणि परिसरात मंगळवारी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली असून सध्या रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.

राज्यभरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून मंगळवारी सकाळपासूनच मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर बघून मुंबईकर धास्तावले. ढगांच्या गडगडाटाने मुंबईकरांच्या मनात भीतीचे काहुर उठले. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर पावसाचा परिणाम झालेला नाही. मात्र हार्बर रेल्वेवर पनवेलजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मुसळधार पावसाच्या हजेरीने हालात भर पडली. अरबी समुद्रात आणि बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असे सांगितले जाते. हवामान खात्याने गेल्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात ५ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.

शुक्रवारीही मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पावसात १३ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा राज्यात गेल्या चार महिन्यांत पावसाने १०० टक्के कामगिरी केली असून कोकण व मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर विदर्भात सरासरीच्या २३ टक्के कमी पाऊस झाला आहे.