‘मेट्रो २-ए’, ‘मेट्रो-७’ सुरू होण्यास आणखी विलंब

मुंबई : उपनगरवासीयांचे लक्ष लागलेल्या ‘मेट्रो२-ए’ आणि ‘मेट्रो-७’ला टाळेबंदी आणि मनुष्यबळाच्या अभावाचा फटका बसला असून दोन्ही मार्गिकांचा मुहूर्त काही महिने लांबणीवर पडला आहे. मेट्रो रेल्वेसाठी आवश्यक असलेल्या सुटय़ा भागांच्या आयातीस झालेल्या विलंबामुळे पहिली गाडी अद्याप चारकोप आगारात दाखल होऊ शकलेली नाही. त्याचबरोबर स्थापत्य कामांच्या पूर्ततेसही विलंब होत असून दोन्ही मार्गिकांची उद्दिष्टपूर्ती लांबण्याची चिन्हे आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) गेल्या वर्षीच्या उद्दिष्टानुसार ‘मेट्रो-२ ए’ (दहिसर ते डीएननगर) आणि ‘मेट्रो-७’ (दहिसर पू. ते अंधेरी पू.) या मार्गिका डिसेंबर २०२० मध्ये कार्यरत होणे अपेक्षित होते. दरम्यान टाळेबंदीच्या काळात परप्रांतातील कामगार मूळ गावी निघून गेल्याने हे प्रकल्प रखडले. त्यानंतर एमएमआरडीएने या दोन्ही मार्गिका मे २०२१ मध्ये सुरू होतील असे जाहीर केले होते. त्यानुसार डिसेंबरअखेरीस पहिली मेट्रोगाडी दाखल होऊन, १४ जानेवारीस तिची चाचणी घेण्याचे ठरले होते. एमएमआरडीएने तीन मार्गिकांसाठी मेट्रोगाडय़ा बांधणीचे कंत्राट बंगळूरु येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड यांना दिले आहे. या गाडीच्या बांधणीमध्ये महत्त्वाचा असलेला एक घटक जपान येथून आयात करावा लागत असून, त्यास विलंब होत आहे. परिणामी पहिली मेट्रोगाडी दाखल होण्यास आता मार्च उजाडू शकतो. त्यानंतर चाचणीसाठी द्यावा लागणार वेळ आणि इतर तांत्रिक बाबी पाहता दोन्ही मेट्रो मार्गिका सुरू होण्यास किमान दोन महिन्यांचा विलंब होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चार महिन्यांत दहा गाडय़ा

एकूण ५०४ मेट्रो डबे बांधणीचे कंत्राट भारत अर्थ मूव्हर्स लि.ला देण्यात आले आहे. प्रत्येक मेट्रोगाडीस सहा डबे असतील. पहिली गाडी आल्यानंतर पुढील चार महिन्यांत एकूण १० गाडय़ा येतील. सुरुवातीस दोन्ही मार्गावर प्रत्येकी पाच मेट्रो गाडय़ा, २० ते २५ मिनिटांच्या वारंवारीतेसह धावतील. त्यानंतर प्रत्येक महिन्यात दोन मेट्रोगाडय़ांची भर पडेल. एमएमआरडीएमार्फत १४ मार्गिकांद्वारे सुमारे ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे.

’ मेट्रो २ ए – यलो लाइन – दहिसर ते डीएननगर – १८.६ किमी – १७ उन्नत स्थानके

’ मेट्रो ७ – रेड लाइन – दहिसर पू. ते अंधेरी पू. – १६.५ किमी – १३ उन्नत स्थानके