मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो असलेल्या कुलाबा ते सीप्झ या तिसऱ्या मेट्रो रेल्वे मार्गाचे काम येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील पहिल्या टप्प्यातील मेट्रो सुरू झाल्यानंतर तिसऱ्या मेट्रो रेल्वे मार्गाकडे मुंबईकरांचे डोळे लागले होते. अखेर या मेट्रो मार्गाचे काम डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प ‘मुंबई मेट्रो रेल कॉपरेरेशन लि.’च्या (एमएमआरसी) माध्यमातून राबवण्यात येणार आहे. कुलाबा ते सीप्झ या ३३ किलोमीटरच्या मार्गावर धावणारी भुयारी मेट्रो रेल्वे कुलाबा, वांद्रा-कुर्ला संकुल, अंधेरी औद्योगिक वसाहत आणि सीप्झ या व्यावसायिक केंद्रांना एकमेकांशी जोडेल आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांना या ठिकाणांशी जोडेल. या मेट्रो रेल्वेला आठ डबे असतील आणि दर तीन मिनिटांना एक गाडी सुटेल, असे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

* कुलाबा-सीप्झ या मेट्रो रेल्वे प्रकल्पात २७ स्थानके असतील. पैकी २६ स्थानके भुयारी असतील. आरे कॉलनी स्थानक जमिनीवर असेल.
* राज्य सरकारने कार डेपोसाठी आरे कॉलनीतील ३० हेक्टर जागा संपादित करण्यास परवानगी दिली आहे.
* भुयारी स्थानके सरासरी १५ ते २५ मीटर खोलीवर असतील.
* या भुयारी मेट्रोसाठी ‘कट अ‍ॅण्ड कव्हर’ किंवा ‘न्यू आस्ट्रियन टनेल’ अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
* २०२१ मध्ये ही मेट्रो रेल्वे सुरू होण्याची अपेक्षा असून ताशी दोन्ही दिशांना ७८ हजार प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे