‘स्किप क्यू’ सेवेमुळे स्थानकात पोहोचण्यापूर्वीच तिकीट काढणे शक्य

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या मुंबई मेट्रोचे तिकीट काढणे आता आणखी सोपे होणार आहे. घाटकोपर ते वर्सोवा अशी मेट्रो सेवा पुरविणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रा. लि.ने देशातील पहिल्या मेट्रो मोबाइल तिकिटिंग ‘स्किप क्यू’ या सेवेचे अनावरण केले आहे. गुरुवारपासून ही सेवा सुरू झाली असून ग्राहकांना त्यांच्या घरातून, कार्यालयातून, लोकलमधून कोठूनही मेट्रोचे तिकीट काढता येणार आहे.

तिकिटाच्या रांगेत प्रवाशांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी मेट्रोच्या स्थानकांवर स्वयंचलित टोकन यंत्रे तसेच स्मार्टकार्डद्वारे तिकीट काढण्याची सुविधा पुरवण्यात आली आहे. यातच आता मेट्रोचे तिकीट मोबाइलवरून काढण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे. ‘रिडलर’ या अ‍ॅपवर गुरुवारपासून या सेवेला सुरुवात झाली असून शुक्रवारपासून पेटीएमच्या अ‍ॅपवरूनही मेट्रोचे तिकीट काढता येणार आहे.       याखेरीज येत्या आठवडाभरात मेट्रो वनच्या अधिकृत अ‍ॅपवरूनही तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

या अ‍ॅपमध्ये प्रवाशाने त्याच्या प्रवासाचा मार्ग निश्चित केला की किती रुपये लागतील याची माहिती दर्शविली जाते. ग्राहकाने अ‍ॅपच्या ‘वॉलेट’मध्ये पैसे जमा केले की तिकिटाची खरेदी पूर्ण होईल. हा व्यवहार झाल्यानंतर ग्राहकाच्या मोबाइलवर एक ‘क्यूआर कोड’ येईल. मेट्रोच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेल्या ‘क्यूआर कोड स्कॅनर’वर हा कोड दर्शवल्यास प्रवाशाला आत प्रवेश मिळेल. याच पद्धतीने स्थानकाबाहेर पडतानाही प्रवाशाला मोबाइलमधील ‘क्यूआर कोड’ प्रवेशद्वाराजवळील स्कॅनरवर दर्शवावा लागेल.

अ‍ॅपमध्ये काय?

* कोणत्याही ठिकाणाहून मेट्रोचे तिकीट खरेदी करता येणार.

* तिकीट खरेदी मोबाइलमधील सिम कार्डशी संलग्न राहणार असल्याने हँडसेट बदलल्यानंतरही ‘क्यूआर कोड’ कायम राहील.

* एका वेळी एका प्रवाशाला सहा तिकिटे काढण्याची मुभा.

* मेट्रोमधून प्रवास करीत असतानाही पुढच्या स्थानकासाठीचे तिकीट काढता येणार.